Mumbai Pune Expressway Missing Link project delayed by 4 years: लोणावळा खंडाळा येथील टायगर व्हॅली मधील तुफान वार, मुसळधार पाऊस, दोन मोठे बोगदे बांधण्याचे आव्हान यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक चार वर्ष रखडला. हा मार्ग सुरु होण्यास तब्बल चार वर्षाचा विलंब झाला आहे. विशेष म्हणजे इतका विलंब होऊन देखील या प्रकल्पाचा खर्च केवळ ९५ कोटी रुपयांनी वाढला आहे. हा प्रकल्प २०१७ मध्ये मंजुर झाला तर एक वर्षाने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये पूर्ण होणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यास नऊ वर्षे लागले. या प्रकल्पाला चार वर्षाचा विलंब झाला आहे. खंडाळा घाटातील टायगर व्हॅली मधील भौगोलिक परस्थितीमुळे हा या प्रकल्पाला उशिर झाल्याचे सांगितले जाते.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी, म्हणून खालापूर टोल नाक्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर उजवीकडे १० किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. चार दिवसांनी या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री काळात (२०१७) या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी शिंदे यांच्याकडे रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी होती. एक वर्षाने या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.

चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार होता पण कोविड, भौगोलिक स्थिती, मुसळधार पाऊस, केबल स्टेड पूलाो बांधकाम, आणि दोन मोठे बोगदे यामुळे या कामाला तब्बल चार वर्षे उशिर झाला. एवढा उशिर होऊनही या प्रकल्प खर्चात मंजूर खर्चापेक्षा केवळ ९५ कोटी रुपयांचा वाढ झाली आहे. या प्रकल्पाची निविदा ६ हजार ६०० कोटी रुपये होती. आता खर्च ६ हजार ६९५ कोटी रुपये झाला आहे. विरोधकांनी या वाढलेल्या अल्पशा खर्च व चार वर्षाच्या विलंबावर टीका केली आहे.