मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काही तासाने मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा प्रकल्प सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा कालावधी २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे. मिसिंग लिंक म्हणजे नेमके कायआणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कुसगाव ते खोपोली मार्गिकेला मिसिंग लिंकला नाव कसे पडले हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अनुषंगाने मिसिंग लिंक म्हणजे दोन महत्त्वाच्या रस्त्यांना किंवा महामार्गांना जोडणारा भाग, जो अपूर्ण अवस्थेत असतो. पुढे तो अपूर्ण भाग जोडला जातो, त्यावेळी त्याला मिसिंग लिंक म्हणून संबोधले जाते. रस्त्यांना वा महामार्गांना जोडणारा अपूर्ण भाग हा पूल, रस्ता, उन्नत रस्ता, बोगदा, भूयारी मार्ग अशा स्वरूपात असतो. मुंबईत सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्यासह अन्य काही प्रकल्पात मिसिंग लिंकचे अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आजघडीला याचे उत्तम उदाहरण म्हणजेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आजघडीला राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग ठरला आहे.

तर दुसरीकडे या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने आता हा महामार्ग वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. वाहतूक कोंडीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे महामार्गाची क्षमता वाढविण्यासह प्रवास अतिजलद, सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खोपोली – कुसगाव दरम्यान मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला. हीच मार्गिका मिसिंग लिंक म्हणून आज ओळखली जात आहे. महामार्गाला जोडणारा हा अपूर्ण भाग असल्याने ही मार्गिका मिसिंग लिंक ठरली. पुढे या प्रकल्पाचे नावच मिसिंग लिंक झाले.

 महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आहे कसा ?

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर कमी झाले. हे अंतर आणखी कमी करून प्रवास अधिक जलद करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम हाती घेतले. फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामाला दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली – कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी झालाआहे. या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात आले आहेत. यातील एक बोगदा १.७५ किमीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. २१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा असून हा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असेल, असा दावा केला जात आहे. तर ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा जात आहे.

जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात आले असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात आले आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. ६,६९५.३७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. तर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे.

चार वर्षे विलंब

हा मिसिंग लिंक प्रकल्प २०२१ मध्ये सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना काळाचा फटका आणि आवाहनात्मक काम यामुळे प्रकल्पास चार वर्षे विलंब झाल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जाते. पण आता मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला असून १ मे रोजी हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होत असून त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास अतिजलद होणार आहे. प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे.