मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर काही तासांनी वाहतुकीसाठी खुली होईल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जाहीर केले होते. त्यानुसार लोकार्पणानंतर काही वेळातच मुंबई-पुणे मार्गिका खुली करण्यात आली असून प्रवाशांना दिलासा मिळाला.
मात्र त्याचवेळी मिसिंग लिंकवरील पुणे – मुंबई मार्गिका शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत खुली झालीच नाही. ही मार्गिका शनिवारी सकाळी मार्गिका खुली होईल असे अपेक्षित होते. परंतु शनिवारी सकाळीही ही मार्गिका खुली होण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागली, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने वाहनचालक, प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. अखेर शनिवारी दुपारी १ च्या सुमारास पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली आणि प्रवासी-वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधली. या मिसिंग लिंकचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास झाले. लोकार्पणानंतर तात्काळ मुंबई-पुणे मार्गिका वाहतुकीसाठी खुली करून वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालक-प्रवाशांना दिलासा देण्यात आला. तर पुणे-मुंबई मार्गिकेवर लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आला होता. हा मंडप काढून मार्गिका रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन सायंकाळी ६ पर्यंत मार्गिका खुली केली जाईल असे एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी सांगितले. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मार्गिका खुली झालीच नाही. रात्री उशिरापर्यंत मंडप काढून मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल असे वाटत होते. परंतु पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका शुक्रवारी खुली झालीच नाही. शनिवारी सकाळीही मार्गिका बंद असल्याने मिसिंग लिंकवरून अतिजलद प्रवास करण्यासाठी निघालेल्या वाहनचालक-प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना जुन्याच महामार्गाने घाटातून प्रवास करावा लागला. घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. शुक्रवारी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यानंतर पुन्हा शनिवारी मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतरही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक-प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
याविषयी एमएसआरडीसीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी पुणे-मुंबई मार्गिका अद्याप खुली झाली नसल्याचे कबूल केले.
रात्री मंडप काढण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता सकाळपासून कामास सुरुवात झाली आहे. या कामाला काहीसा वेळ लागत असल्याने दुपारी १२ पर्यंत मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल, असे अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, मिसिंग लिंक खुली न झाल्याने समाजमाध्यमावर टीका होऊ लागल्याने अखेर एमएसआरडीसीने मंडप हलविण्याच्या कामाला वेग दिला आणि शनिवारी दुपारी १ वाजता पुणे – मुंबई मिसिंग लिंक मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली.
‘कनेक्टिंग’ नव्हे ‘मिसिंग लिंक’च; अभिजित पानसे संतापले
मोठ्या दिमाखात मिसिंग लिंकचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. लोकार्पणाच्या वेळी झालेल्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी यापुढे कोणालाच महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही याची खात्री मी देतो असेही म्हटले. तर ही ‘मिसिंग लिंक’ नसून अतिजलद प्रवासाची ‘कनेक्टिंग लिंक’ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मिसिंग लिंक खुली झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी दिली खरी, मात्र मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका शनिवारी दुपारी १ पर्यंत बंदच होती. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना घाटातूनच वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागला. वाहनचालक-प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मनसे नेते अभिजित पानसेही शनिवारी पुणे-मुंबई प्रवासादरम्यान दीड तास वाहतूक कोंडीत अडकले होते. मिसिंग लिंकवरून अतिजलद प्रवास करता येईल असे वाटत असताना दीड तास कोंडीत अडकावे लागल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी प्रसारमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपला संताप व्यक्त केला. मिसिंग लिंक ‘मिसिंग’ असल्याची तक्रार आपल्याला पोलिस ठाण्यात करायची आहे, जवळ कोणते पोलिस ठाणे आहे, कोणी सांगले का, असा संतप्त सवालही त्यांनी केला. तर ‘कनेक्टिंग’ नव्हे ही ‘मिसिंग लिंक’च असल्याचा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
