मुंबई… मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक नुकतीच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या प्रकल्पातील दोन बोगदे जगातील सर्वात रूंद बोगदे ठरले असून या बोगद्यांची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये झाली आहे. या बोगद्यातून आणि दऱ्याखोऱ्यातून उन्नत मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी-वाहनचालकांना या मिसिंग लिंकची भुरळ पडली आहे. त्यामुळेच तेथून प्रवास करताना प्रवासी-वाहनचालक बोगद्यात, उन्नत मार्गावर गाड्या थांबवून सेल्फी ,फोटो, व्हिडिओ घेत असू रिल्स बनवत आहेत.
मात्र हे सुरक्षेच्यादृष्टीने धोक्याचे असून वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हणत आता महामार्ग पोलिसांनी मिसिंग लिंकवर वाहने थांबविणार्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ५०० रुपयांचा दंड पोलिसांकडून आकारला जात आहे. त्यानुसार शनिवारी महामार्ग पोलिसांनी १५ वाहनचालकांविरोधात कारवाई केली आहे. मिसिंग लिंक पर्यटनस्थळ नाही असे म्हणत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मिसिंग लिंकवर न थांबण्याचे आवाहन प्रवासी-वाहनचालकांला केले आहे.
मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी कमी करून प्रवास अतिजलद करण्यासाठी तसेच महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी १३.३ किमीची खोपोली ते कुसगाव अशी मिसिंग लिंक एमएसआरडीसीकडून बांधण्यात आली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचे लोकार्पण झाले. लोकार्पणानंतर तात्काळ मुंबई-पुणे मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
तर पुणे-मुंबई मार्गिका शनिवारी दुपारी १ वाजता वाहतूक सेवेत दाखल झाली. दरम्यान डोंगर, दर्याखोर्यातून, तलावाखालून जाणार्या या मिसिंग लिंक प्रकल्पाकडे अभियांत्रिक चमत्कार (इंजिनियरींग मार्वल) म्हणून पाहिले जात आहे. तर या प्रकल्पातील दोन बोगदले जगातील सर्वात रूंद बोगदे ठरले आहे. या बोगद्यांची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाल्याने जागतिक स्तरावर या प्रकल्पाला आता ओळख प्राप्त होणार आहे. त्याचवेळी
या प्रकल्पातील उन्नत मार्ग अर्थात केबल स्टेड पूल हा देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल ठरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची भूरळ या मार्गावरून जाणार्या प्रत्येकाला पडत आहे. यातूनच मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने वाहने बोगद्यात आणि पुलावर उभी करून सेल्फी,व्हिडिओ घेतले जात आहेत. तर रिल्सही बनविले जात आहे.
मिसिंग लिंक हा प्रवेश नियंत्रित मार्ग असून यावर ताशी ८० ते १०० किमी अशी वेगमर्यादा आहे. अशावेळी मिसिंग लिंकवर वाहने थांबवून सेल्फि काढणे, व्हिडिओ काढणे, रिल्स बनविणे धोक्याचे आहे. स्वतबरोबर इतरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे निर्माण होतो. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. त्यामुळे शनिवारपासून अशा वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरु केल्याची माहिती तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस यांनी लोकसत्ताला दिली. शनिवारी १५ जणांविरोधात कारवाई केली आहे.
मोटार वाहन कायद्यातील कलम १२२ आणि १७७ नुसार चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे आणि सार्वजनिक ठिकाणी वाहनांमुळे अडथळा निर्माण करणे याखाली वाहनचालकांविरोधात कारवाई केली जात आहे. ५०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याचे चिखले यांनी सांगितले. तर रविवारीही कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.या कारवाईनंतर वाहने थांबणे बंद होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर एमएसआऱडीसीचे वरिष्ठ अधिकारी राहूल वसईकर यांनीही वाहने थांबवू नये असे आवाहन प्रवाशांना-वाहनचालकांना केले आहे.
