मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर ३० मिनिटांनी कमी करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली – कुसगाव दरम्यान मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम २०२२ मध्येच पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे कामाला विलंब झाला असून आता या मार्गिकेचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.ही मार्गिका १ मे रोजी सेवेत दाखल करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई – पुणे प्रवास १ मेपासून सुसाट होणार असून प्रवासाचे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
एमएसआरडीसीच्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजघडीला सर्वाधिक वर्दळीच्या अशा या महामार्गावरून दिवसाला ६५ हजार वाहने धावतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात महामार्गावर भविष्यात वाढणारी प्रवासी संख्या सामावून घेण्यासाठी एमएसआरडीसीने महामार्गाचे दहापदरीकरण करण्यासह मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१९ मध्ये खोपोली – कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या मार्गिकेच्या कामाला दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली.
पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करीत आहे. हे काम २०२२ मध्ये पूर्ण होऊन मिसिंग लिंक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही प्रवासी-वाहनचालकांना मिसिंग लिंकची प्रतीक्षाच आहे. तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला आहे, मात्र संंथगती कामामुळे प्रकल्प लांबवणीवर पडत असल्याचाही आरोप होत आहे. पण हे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याने कामाला वेळ लागत असल्याचे स्पष्टीकरण सातत्याने एमएसआरडीसीकडून दिले जात आहे. आता मात्र या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
मिसिंग लिंकचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करून त्यानंतर लोड टेस्ट घेऊन त्यासंबंधीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाईल आणि १ मे रोजी मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती एमएसआरडीच्या पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. काम अंतिम टप्प्यात असल्याने आता मार्गिकेचे लोकार्पण लांबणीवर जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे १ मे रोजी मिसिंग लिंक सेवेत दाखल होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
खर्चात १० टक्क्यांनी वाढ
प्रकल्पाचा खर्च ६ हजार ८५० कोटी रुपयांवरून आता थेट ७ हजार ५०० कोटी रुपयांवर गेला आहे. प्रकल्पाला चार वर्षे विलंब झाल्याने खर्चात १०टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रकल्प पूर्णत्वाच्या अनेक तारखा चुकल्या
हा प्रकल्प मुळ करारानुसार २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विलंब झाल्याने आतापर्यंत प्रकल्प पूर्णत्वाच्या अनेक तारखा चुकल्या आहेत. डिसेंबर २०२२, त्यानंतर जून २०२३, त्यानंतर जानेवारी २०२४, मार्च २०२४, डिसेंबर २०२४, मे २०२५, डिसेंबर २०२५ अशा अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. आता शेवटची तारीख मार्च २०२६ होती. मात्र आता तीही चुकली असून आता १ मेचा नवा मुहूर्त देण्यात आला आहे.
