मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहापदरीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. या प्रस्तावानुसार महामार्गाच्या रुंदीकरणासह ९४.५ किमीच्या मूळ महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. सहापदरी महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे आयुर्मान ३० वर्षे होते. त्यानुसार हे आयुर्मान २०३० मध्ये संपणार आहे. त्यामुळे महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्याची गरज निर्माण झाल्याने दहापदरीकरण प्रकल्पाअंतर्गतच नव्याने काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.
मुंबई-पुणे प्रवास अतिजलद करण्यासाठी ९४.५ किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग एमएसआरडीसीकडून बांधण्यात आला. हा महामार्ग दोन टप्प्यांत सेवेत दाखल करण्यात आला असून, २००२ पासून या महामार्गावर पूर्ण क्षमतेने वाहने धावत आहेत. आजच्या घडीला हा राज्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गावरून दिवसाला ६५ ते ७५ हजार वाहने धावतात. शनिवार-रविवारी वाहनांची संख्या एक लाखांच्या वर जाते. आता वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी हा महामार्ग अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करून महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी एमएसआरडीसीने ””मिसिंग लिंक”” आणि दहापदरीकरण असे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील ””मिसिंग लिंक”” प्रकल्प नुकताच पूर्ण झाला आहे. आता महामार्गाचे दहापदरीकरण प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी दहापदरीकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार अंदाजे १६ हजार कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे दहापदरीकरण करण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या सहापदरी रस्त्याचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
सहापदरी महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे आयुर्मान ३० वर्षे आहे. त्यानुसार आता हे आयुर्मान संपण्यासाठी अवघी तीन-चार वर्षे शिल्लक असल्याने काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहापदरीकरणाच्या प्रकल्पातच अस्तित्वात असलेल्या सहापदरी रस्त्याचे नव्याने काँक्रीटीकरण केले जाणार असल्याचे एमएसआरडीसीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. दहापदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून २०३० पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दहापदरीकरण पूर्ण झाल्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरून वाहतूक सुरू ठेवून सहापदरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. काँक्रीटीकरण झाल्यानंतर संपूर्ण महामार्ग चकाचक होईल, असा दावाही एमएसआरडीसीने केला आहे.
