मुंबई :  मुंबई पुणे एक्सप्रेस अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी वाहतूक २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.

तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.

या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाचा ९८३३४९८३३४  या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तरी या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रवास टाळता आला तर वाहनचालकांना त्रास कमी होईल