मुंबई: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्यानंतर झालेल्या दिर्घ वाहतूक कोंडीतून शिकवण मिळाली असून यापुढे अशी घटना घडल्यास त्वरित कोणत्या उपाययोजना पाहिजेत याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा एखादी दुर्घटना घडल्यास त्या मार्गावरील अन्य वाहनधारकांना त्वरित एसएमएसव्हारे माहिती देणारी यंत्रणा विकसित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधासभेत दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबत चेतन तूपे, अमित साटम, जयंत पाटील,आदित्य ठाकरे आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणारा कोची, केरळ येथून सुरत- गुजरात येथे जाण्याकरिता निघालेला टॅंकर पलटी होऊन त्यामधील ज्वलनशील वायूची गळती सुरु झाली होती. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ३६ तास बंद करण्यात आली होती.
या घटनेमुळे सरकारला धडा- शिकवण मिळाली असून ज्वलनशील पदार्धांची वाहतूक करणाऱ्या कंपन्याकडेही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. भविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडून नये यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पद्धतीच्या आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणा, साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या संबंधित कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून, योग्य मार्गदर्शक सूचना ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) प्रणाली सध्या कार्यरत आहे.
या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन, नियंत्रण, तसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएस चा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने याबाबतची सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरुन प्रत्येक प्रवाशास अशा पद्धतीच्या परिस्थितीचा संदेश तत्काळ देता येईल, यासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
या वाहतूक कोंडीच्या कालावधीत ३६ तासांत वसूल करण्यात आलेला पाच कोटींचा पथकर हा संबंधित मालकांना परत देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच इतर प्रगत देशांमध्ये अशा आपातकालिन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येते याची पडताळणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक कोंडीची दखल घेऊन त्याबाबत अभ्यास करणे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच अशा परिस्थितीतील वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभा (आयआरसी) चे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.
