मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी झालेला मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सोमवारीही (२६ जानेवारी) सुरळीत होण्याची शक्यता नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामगारांनी सोमवारपासून (२६ जानेवारी) रास्ता रोको आंदोलन आणि बेमुदत उपोषणाचा इशारा दिला असून वेतनवाढ, सुरक्षा साधने, वैद्यकीय सुरक्षा विमा, जादा तास काम करण्याचा मोबदला मिळावा अशा विविध मागण्या कामगारांनी केल्या आहेत. कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या काही काळापासून प्रलंबित आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेचे काम आयआरबी व आर्यन पंप यांच्याद्वारे करण्यात येते. शेकडो कामगारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाचे संघटक सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी केला आहे. मात्र, त्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुळातच सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याजवळील लोणावळा, खंडाळा अशी पर्यटनस्थळे गजबजली आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारीही वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यात आंदोलनामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मंगळवारीही (२७ जानेवारी) तेथील वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

कामगारांचे आंदोलन का? कामगारांच्या मागण्यांबाबत वारंवार लेखी निवेदन देण्यात आले, बैठकाही झाल्या. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रास्ता रोको आणि उपोषणाचा पर्याय निवडला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास तसेच सार्वजनिक गैरसोयी यांबाबत प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या रास्ता रोको आंदोलनात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी होणार असून मुंबई-पुणे द्रुतगती मागर्ावरील कुसगाव कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती पुणे जिल्हा मजदूर संघाचे सचिन मेंगाळे यांनी दिली. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी अर्जुन चव्हाण, सागर पवार, उमेश विश्वास, बाळासाहेब पाटील तसेच भारतीय मज़दूर संघ पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत.