मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गॅस टँकर उलटला आणि मोठी गॅस गळती झाली. ज्वलनशील प्रोपलिन गॅसची गळती झाल्याने सुरक्षेच्यादृष्टीने वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला. वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गासह इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. परिणामी महामार्गावर आणि जुन्या महामार्गावरही मोठी कोंडी झाली. वाहने, प्रवासी, वाहनचालक एकाच ठिकाणी अन्न-पाण्याशिवाय अडकून पडले. त्यांचे प्रचंड हाल झाले. मगंळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत वाहतूक बंद होती. तर गॅस गळती रोखण्यात बुधवारी दुपारी काही प्रमाणात यश आल्यानंतर एमएसआरडीसीने मुबंई वाहिनीवरून पुणे आणि मुंबई अशा दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक सुरू केली. मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल ३० तास लागले.
राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा आणि दररोज ७५ हजारांहून अधिक वाहने धावत असलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंगळवारी आणि बुधवारी मंदावली. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास महामार्गावरील बोरघाट येथील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला. टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस उलटला. त्यानंतर टँकरच्या तीन व्हाॅल्वमधून गळती सुरू झाली. अत्यंत ज्वलनशील अशा प्रोपलिन गँसची गळती होत असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. वाहतूक जुन्या महामार्गाने, इतर पर्यायी मार्गाने वळवली. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक घटनास्थळी दाखल झाले.
रात्रभर गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र यात यश येत नव्हते. त्यामुळे शेवटी एमएसआरडीसीने या क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावले. भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि रिलायन्स कंपनीतील तज्ज्ञांचे पथक आल्यानंतर गॅस गळती रोखण्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली. त्यानुसार बुधवारी ३ पर्यंत टँकरच्या दोन व्हाॅल्वमधील गॅस गळती रोखण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. गळती रोखल्यानतंर मुंबई वाहिनीवरून मुंबई-पुणे अशा दोन्ही दिशेची वाहतूक सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वाहतूक संथगतीने का होईना, पण सुरू झाल्याने वाहनचालक – प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
टँकरच्या तिसऱ्या व्हाॅल्वमधील गळती रोखून टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. त्यानंतर रिकामा टँकर घटनास्थळावरून हटविण्यात आला. यासाठी रात्रीचे ९ वाजले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि मोठी दुर्घटना टळली.
२००२ नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग २००२ मध्ये सेवेत दाखल झाला. या महामार्गामुळे मुंबई – पुणे प्रवास अतिजलद झाला. हा महामार्ग राज्यातील आजघडीला सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा महामार्ग मानला जातो. या महामार्गावरून दररोज ७५ हजारांहून अधिक वाहने धावतात. या महामार्गावर आतापर्यंत अनेक छोटे – मोठे अपघात झाले. मात्र २४ तासांहून अधिक काळ कधीही महामार्ग ठप्प झाला नव्हता. पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पथकर माफ
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या २० ते २५ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. पर्यायी मार्गाने वाहने अत्यंत संथगतीने पुढे जात होती. त्यानंतर बुधवारी मुबंई वाहिनीवरून दुहेरी वाहतूक सुरू केल्यानंतर वाहनांकडून पथकर वसुली केली जात होती. यावर वाहनचालक – प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. समाज माध्यमांवर मोठी टीका झाली. त्यानंतर बुधवारी दुपारी एमएसआरडीसीने पथकर माफ करण्याचा निर्णय घेतला आणि वाहने पथकर वसुलीशिवाय पुढे जाऊ लागली.
कोंडीत अडकलेल्या वाहनचालक-प्रवाशांचे अन्नपाण्याशिवाय हाल होत होते. यावरूनही समाज माध्यमांवर टीका होत होती. मात्र आमच्याकडून प्रवासी-वाहनचालकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या. मुंबई-पुणे प्रवास आज टाळा, असे आवाहन रेडीओ आणि समाज माध्यमातून करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर वाहनचालक-प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, तसेच बिस्कीटांचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

