मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे, अर्थात खोपोली – कुसगाव दरम्यानच्या १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या प्रकल्पाच्या कामावरून अखेरचा हात फिरविण्यात येत असून दोन दिवसांत या मार्गिकेवरील वजनासंबंधीच्या (लोड टेस्टिंग) चाचण्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरुवात केली जाणार आहे. चाचण्या पूर्ण करून ३० एप्रिलपर्यंत ही मार्गिका सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सज्ज होणार आहे. तर राज्य सरकारने या मार्गिकेच्या लोकार्पणासाठी वेळ दिल्यानंतर ती सेवेत दाखल केली जाणार आहे.

एमएसआरडीसीकडून मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग २००२ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला. आजघडीला राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा असा हा महामार्ग ठरला आहे. या महामार्गावरून दररोज ७० हजारांहून अधिक वाहने धावतात. भविष्यात या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. हा महामार्ग आताच वाहनांना सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून अपघातांची भीतीही वाढली आहे.

ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने महामार्गाचे दहा पदरीकरण करण्यासह मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१९ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ही मार्गिका पूर्ण होऊन ती वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम आणि करोनाकाळातील फटका यामुळे प्रकल्पास विलंब झाला आहे. पण आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून मे महिन्यात या मार्गिकेवरून वाहने धावण्यास सुरुवात होणार आहे.

मार्गिकेचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून ती १ मे रोजी सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत या प्रकल्पाचे काम १०० टक्के पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता केवळ फिनिशिंगची कामे सुरू आहेत.

रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डांबरीकरण दोन दिवसांत पूर्ण करून मार्गिकेवर वजनासंबंधीच्या चाचण्यांना, अर्थात लोड टेस्टिंगला, सुरुवात केली जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. या चाचण्या पूर्ण करून ३० एप्रिलपर्यंत मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज असेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ही मार्गिका १ मे रोजी वाहतूक सेवेत दाखल केली जाईल, मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून यासाठी हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे १ मे रोजी मार्गिकेचे लोकार्पण होण्याची शक्यता कमी आहे. मेच्या पंधरवड्यापर्यंत मिसिंग लिंकचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

याविषयी गायकवाड यांना विचारले असता, राज्य सरकारकडून जी तारीख दिली जाईल त्या तारखेला ही मार्गिका सेवेत दाखल होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास द्रुतगती महामार्गावरील घाटाचा वळसा टळणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा अवधी वाचणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.