मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्यालगतच्या पुलावर सोमवारी सकाळी दरड कोसळल्याने मिसिंग लिंक तातडीने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. मात्र, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुलावरील दरड हटविण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, दरड कोसळलेल्या पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा वाहतुकीसाठी बंद ठेवून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या तेथून वाटेत अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला जात आहे. दरड हटविण्यासाठी किमान पाच तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी मुंबई-पुणे प्रवास करावा, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करणारा मिसिंग लिंक १ मे रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच या नव्या कोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याने त्यावर टीका होत होती. अशातच सोमवारी सकाळी मिसिंग लिंकवरील पुलावर, बोगद्याच्या प्रवेशद्वारालगत उंचावरून दरड कोसळली. दरडीचा काही भाग तसेच प्रवेशद्वारालगतचा संरक्षक भाग पुलावर कोसळला. यावेळी या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने जिवितहानी झाली नाही. या घटनेनंतर एमएसआरडीसीने तातडीने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. त्यानंतर दरड हटविण्याचे काम तातडीने पथकाकडून हाती घेण्यात आले. त्याचवेळी सकाळी नऊच्या सुमारास मिसिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. तर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळल्याने ती मार्गिका बंद असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच तास लागण्याची शक्यता असून त्यानंतर मिसिंग लिंक पूर्णपणे पूर्ववत होईल, असेही त्यांनी सांगितले.

स्लॅब नाही तर दरड कोसळली…

दरम्यान, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी मिसिंग लिंकचा स्लॅब किंवा इतर कोणताही संरचनात्मक भाग कोसळलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बांधकामाला कुठेही धक्का बसलेला नाही. उंचावरून दरड कोसळून ती पुलावर पडल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे मिसिंग लिंकवरील एक मार्गिका बंद असून दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.