मुंबई: जोरदार पाऊस पडल्याने मध्य रेल्वेच्या कर्जत – लोणावळा घाटात दरड कोसळून सोमवारी रेल्वे सेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवासी मेल, एक्स्प्रेसमध्ये अडकले. यातून मध्य रेल्वेने केलेली पूर्व पावसाळी कामे नीट झाल्याचे केलेले दावे खोटे ठरल्याचे दिसते आहे. मध्य रेल्वेच्या घाट विभागात दरड कोसळू नये, यासाठी मध्य रेल्वे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्व पावसाळी कामे करते. यावर्षीही दरड कोसळू नये, कोसळल्यास ती अडवली जावी यासाठी जाळ्या बसविण्याची कामे केली. परंतु, दरड कोसळून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने, प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
मध्य रेल्वेने पूर्व पावसाळी कामात कमकुवत दरडी तपासून त्या सुरूंग लावून फोडणे, घाट भागात लोखंडी जाळ्या बसविणे, लहान-मोठ्या दरडी काढून त्याची वाहतूक विशेष रेल्वेगाडीने करणे, अशी कामे केली होती. रेल्वे रूळांची, ओव्हर हेड वायरची देखभाल दुरूस्ती केली होती. मात्र, तरीही दरड कोसळून मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सोमवारी ठप्प झाला. मध्य रेल्वे प्रशासन पूर्व पावसाळीकामे करूनही पावसाळ्यात अशा घटना होऊन प्रवाशांना वेठीस धरले जाते, याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसामुळे कर्जत – खोपोली दरम्यान रेल्वे रूळांखालील खडी वाहून गेली. रुळावर माती साचली, रेल्वे रुळांजवळील झाडांच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर पडून यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक, मालवाहतुकीला मोठा फटका बसला. त्यामुळे मध्य रेल्वे कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्व पावसाळी कामे हाती घेते. मात्र, तरीही पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत असतील तर रेल्वेच्या पूर्व पावसाळी कामाबाबत प्रश्न उपस्थित होतो, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी मांडली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने यावर्षी कल्याण-लोणावळा-कर्जत आणि कसारा-इगतपुरी दरम्यानच्या आव्हानात्मक घाट विभागांवरही विशेष लक्ष दिले होते. पावसाळ्यात भूस्खलन, दरड कोसळणे, भूस्खलन आणि उताराच्या घसरणीसाठी असुरक्षित असतात. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मदतीने आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तांत्रिक साहाय्याने, रॉकफॉल बॅरियर, बोल्डर नेटिंग, बोल्डर फॉल फेन्सिंग, टनेल पोर्टल्स, गॅबियन स्ट्रक्चर्स, रिटेनिंग वॉल मजबुतीकरण यांसारख्या आधुनिक संरक्षण प्रणालींची अंमलबजावणी केली होती. गेल्या तीन वर्षांत, व्यापक संरक्षण कामांमुळे घाट विभागांमध्ये दगड कोसळण्याच्या आणि हवामानामुळे होणाऱ्या व्यत्ययांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने जून २०२६ मध्ये दिली होती. परंतु, सोमवारी दरड कोसळून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने, रेल्वे प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरल्याची संतापजनक प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
