मुंबई : अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचे नुकसान झाल्यामुळे मुंबई – पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, शनिवारपासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बस फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या विशेष नियोजनाअंतर्गत ई – शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्यांसह साध्या बसेसच्या २०० जादा फेऱ्या मुंबई – पुणे मार्गावर दररोज चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या शिवाय, प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकीच्या सोयी अभावी अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सरनाईक म्हणाले.
मुंबई – पुणे इंटरसिटीसह पुण्याहून पुढे जाणाऱ्या गाड्या रद्द
कर्जत – लोणावळा दरम्यानच्या घाटातील रेल्वे रुळावर मंकी हिल नजीक दरड कोसळल्यामुळे मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या आणि पुण्यावरून पुढे जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने डेक्कन क्वीन, इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, चेन्नई मेल, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इंदौर एक्स्प्रेस, हैद्राबाद एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस आदी गाड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
