मुंबई : कर्जत–लोणावळा घाट विभागातील भूस्खलनामुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतूक ठप्प होणे, मुंबई महानगरातील मुसळधार पाऊस आणि लोकल सेवांमध्ये झालेले बदल; यामुळे प्रवासी अद्ययावत माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्याकडे वळाले आहेत. परिणामी, अवघ्या एका दिवसात मध्य रेल्वेच्या ‘एक्स’ खात्यावर तब्बल १२ हजार नव्या फॉलोअर्सची भर पडली. मध्य रेल्वेच्या या खात्यावर आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक पोस्ट करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर तसेच घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाकूरवाडी – मंकी हिल दरम्यान रविवारी मध्यरात्री १.५५ वाजता डाऊन मुख्य मार्ग आणि मध्य मार्गावर भूस्खलन झाल्याची नोंद झाली. त्यानंतर त्याच परिसरात आणखी दोन वेळा दरडी कोसळल्याने मुंबई – पुणे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
सोमवारी भारतीय हवामान विभागाने मुंबईसह परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. आठवड्याचा कामकाजाचा पहिला दिवस असल्याने सकाळपासून लाखो प्रवासी घराबाहेर पडले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि घाट विभागातील भूस्खलनामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या, तर उपनगरीय लोकल सेवाही विलंबाने धावत होत्या. या पार्श्वभूमीवर गाड्यांची सद्यस्थिती, विलंब, रद्द किंवा वळविण्यात आलेल्या गाड्या, घाट विभागातील परिस्थिती, दुरुस्तीच्या कामाची प्रगती आणि सेवा पूर्ववत होण्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. दिवसभर रेल्वे प्रशासनाने सातत्याने प्रवासीभिमुख अद्ययावत माहिती प्रसारित केली.
आपत्कालीन परिस्थितीत समाजमाध्यमांची प्रभावी भूमिका
पावसाळ्यात रेल्वे सेवांवर परिणाम झाल्यास कोणत्या मार्गावर पाणी साचले, कोणत्या लोकल व एक्स्प्रेस सेवा सुरू आहेत, कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, याची तातडीची माहिती ‘एक्स’द्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होते आणि अफवांनाही आळा बसतो. तसेच तक्रारींचे तत्काळ निराकरण झाल्यानंतर अनेक प्रवासी समाजमाध्यमांवरून रेल्वे प्रशासनाचे आभारही व्यक्त करतात.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या तत्पर आणि पारदर्शक माहिती व्यवस्थापनामुळे प्रवाशांचा अधिकृत ‘एक्स’ खात्यावरील विश्वास आणखी वाढला असून, याचाच परिणाम म्हणून एका दिवसात तब्बल १२ हजार नव्या फॉलोअर्सची नोंद झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
