मुंबई : लोणावळा – कर्जत घाट विभागात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, १०० तास उलटले तरी, मुंबई – पुणेदरम्यानच्या दोन रेल्वे मार्गिका ठप्प असल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. देखभाल- दुरुस्तीच्या कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान २२ नियमित आणि ८ विशेष अशा एकूण ३० गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अल्प सूचनेवर गाड्या रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी आधीच गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून घाट विभागातील तिन्ही मार्गिका पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून पुनर्बांधणीवर लक्ष ठेवून आहेत. प्रतिकूल हवामानातही अभियंते आणि कर्मचारी चोवीस तास काम करत असून रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

१७ जुलैपर्यंत रद्द झालेल्या महत्त्वाच्या नियमित गाड्या

हुबळी–दादर एक्स्प्रेस

दादर–हुबळी एक्स्प्रेस

इंदूर–दौंड एक्स्प्रेस

दौंड–इंदूर एक्स्प्रेस

सीएसएमटी–हैदराबाद एक्स्प्रेस

हैदराबाद–सीएसएमटी एक्स्प्रेस

डेक्कन क्वीन (दोन्ही दिशेने)

डेक्कन एक्स्प्रेस (दोन्ही दिशेने)

इंटरसिटी एक्स्प्रेस (सीएसएमटी–पुणे/पुणे–सीएसएमटी)

सीएसएमटी–चेन्नई सुपरफास्ट मेल

चेन्नई–सीएसएमटी सुपरफास्ट मेल

महालक्ष्मी एक्स्प्रेस (निर्धारित कालावधीत)

जोधपूर–हडपसर आणि हडपसर–जोधपूर एक्स्प्रेस

दादर–सातारा, सातारा–दादर एक्स्प्रेस (निवडक दिवशी)

दादर–साईनगर शिर्डी आणि साईनगर शिर्डी–दादर एक्स्प्रेस (निवडक दिवशी)

८ विशेष गाड्याही रद्द

मध्य रेल्वेने गोरखपूर, गाझीपूर सिटी आणि हजरत निजामुद्दीन मार्गावरील ८ विशेष गाड्याही विविध तारखांना रद्द केल्या आहेत.

रेल्वेमंत्र्यांचा घटनास्थळी आढावा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे मुंबई घाट विभागातील भूस्खलनग्रस्त रेल्वे मार्गावरील पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या भूस्खलनात रेल्वे मार्गासह आजूबाजूच्या परिसराचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

वैष्णव म्हणाले की, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची पथके समन्वयाने पुनर्बांधणीचे काम करत आहेत. घाट विभागातील तीनपैकी एक मध्यम मार्गिका वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आली असून, स्लिप लाईन उपलब्ध नसल्याने बँकर इंजिन वापरणे शक्य नाही. त्यामुळे सर्व गाड्या दोन लोकोमोटिव्ह (दोन इंजिन) जोडून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी पुनर्बांधणीसाठी लागणारे साहित्य पोहोचविणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या समन्वयाने काम सुरू आहे. घाट विभागातील उर्वरित मार्गिका शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी रेल्वेची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.