मुंबई: ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेल्या पैशांतून महागड्या मोबाइलची खरेदी करणाऱ्याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून सात नवीन महागडे मोबाइल हस्तगत केले. या आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वरळी येथे राहणाऱ्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाली होती. अहमदाबाद येथे जायचे असल्याने तक्ररदार भाडेतत्त्वावर मोटरगाडी शोधत होते. त्यासाठी ते गुगलवर सर्च करीत असताना त्यांना महादेव कार रेंटल डॉट कॉम हे संकेतस्थळ दिसले. त्या संकेतस्थळावर हवी ती गाडी आणि आवश्यक माहिती त्यांनी भरली. त्यानंतर त्यांनी क्रेडीट कार्डाची माहिती भरल्यानंतर त्यांना ‘पेमेंट एरर’ असा संदेश आला. त्यावेळी समोरून संकेतस्थळाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक आली. ती लिंक डाऊनलोड करून त्यात सर्व माहिती भरल्यावरही पुन्हा ‘पेमेंट एरर’ संदेश आला. थोडावेळाने तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख ७९ हजार ९०० रुपयांचा व्यवहार झाल्याचा संदेश आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली.

हेही वाचा – करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन

पोलीस पथकाने माहिती घेतली असता या व्यवहारातून लोअर परळच्या फिनिक्स मॉल येथून ‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ हा मोबाईल खरेदी केल्याचे समजले. सेजान सय्यद याने तो मोबाइल घेतला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर बीकेसीतील भारत नगरामध्ये राहणाऱ्या सुरज निर्मलला मोबाइल दिल्याचे कळले. सुरजकडे चौकशी केल्यावर त्याने त्याचा भाचा नारायण निर्मलला तो मोबाइल दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा तेथे तपास थांबला. दरम्यान, तो मोबाइल राजस्थानमधील केळवा येथे सुरू होताच पोलिसांनी तेथे जाऊन नारायण तेली या मोबाइल धारकाला गाठले व तो मोबाइल हस्तगत केला. तेव्हा ठाण्यात राहणाऱ्या आदित्य तेली याच्याकडून मोबाइल घेतल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा – ‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?

पोलिसांनी आदित्यला गाठून चौकशी केल्यावर त्याला तो आयफोन मुलुंडमध्ये राहणाऱ्या अक्षय कबाडिया याने दिल्याचे सांगितले. मग अक्षयच्या चौकशीत घाटकोपरमधील इम्रान खान याचे नाव उघड झाले. इम्रानकडे विचारपूस केल्यावर तो मोबाइल सांताक्रुझमध्ये राहणाऱ्या अब्दुल सदावत खान (२२) याने विकल्याचे समजताच त्याला ताब्यात घेण्यात आले. घरोघरी वस्तू पोहोचविण्याचे काम करणारा कर्मचारी सय्यदने तक्रारदाराच्या पैशाने खरेदी केलेला आयफोन अब्दुलला आणून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अब्दुलची झडती घेतली असता त्याच्याजवळ आयफोन १५ प्रो मँक्स, आयफोन १५, वन प्लस, वन प्लस नॉर्ड ए, सॅमसंग एस २४, रेडमी नोट ७ हे नवीन मोबाइल सापडले. अब्दुलने आणखी सात आयफोन १५ प्रो मोबाइल विकल्याचे समोर आले असून ते मोबाइल हस्तगत करण्याचे काम पोलीस करीत आहेत. अब्दुल नुकताच एका गुन्ह्यात जामिनावर सुटला होता.