लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत बेस्ट बस वा रेल्वेत बऱ्याच वेळा बळजबरीने धक्का मारला गेला तर मोबाईल फोन हमखास चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत. असे चोरीचे मोबाईल आता थेट बांगलादेश, नेपाळ येथे अर्ध्या किमतीत विकले जात आहेत. त्यामुळे मोबाईलचा शोध लागला तरी तो परत मिळणे मुश्किल होत आहे. सलग दोन महिने पाळत ठेवून या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले.मुंबईत अशा अनेक धक्का टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांनी परिसर वाटून घेतला आहे. या टोळीची संघटित कार्यपद्धती अचंबित करणारी आहे.

प्रवाशाकडे महागडा ( एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा) मोबाईल दिसला की, त्या प्रवाशाला लक्ष केले जाते. चार-पाच जण या प्रवाशाजवळच घोळका करुन राहायचे. त्यापैकी मोबाईल लंपास करण्यात पटाईत असलेला एकजण आपले काम फत्ते करायचा. त्याला या टोळीत ‘मशीन’ म्हटले जाते. चोरीचा मोबाईल फोन तात्काळ बॅगेत टाकणारा आणखी एक जण तेथे असायचा. त्याला ‘छप्पर देनेवाला’ असे टोपन नाव. बॅगेतील मोबाईल आणखी एकाकडे सोपवला जायचा. त्याला ‘चार्मर’ म्हटले जाते. तो फोन घेऊन आणखी एक व्यक्ती पसार व्हायची. त्याला ‘बूर’ संबोधले जात होते. प्रवाशाच्या लक्षात आले तरी त्याला धक्का मारत विचारही करुन न देणारी चार-पाच जणांची टोळी सक्रिय होऊन जायची. ते या टोळीचे ‘ठेकेदार’. या टोळीने ही नावे का घेतली होती, याचा खुलासा होऊ शकला नाही. परंतु या नावांचा वापर करुनच ही टोळी एकमेकांशी व्हॅाटस् अप संदेशांद्वारे संपर्कात होती. अंधेरी आणि नवी मुंबईतील गर्दीच्या बेस्ट बस हेरून हे रॅकेट चालवत होती, असे तपासात उघड झाले आहे.

या टोळीने गेल्या दीड महिन्यांत १३५ महागडे स्मार्टफोन चोरले होते. बांगलादेश आणि नेपाळमध्ये पाठवण्यापूर्वी हजार मोबाईल फोन चोरी करण्याचा या टोळीचा डाव होता. बांगलादेश आणि नेपाळमध्ये हे मोबाईल फोन  निम्म्या किमतीत विकले जातात. गेल्या दीड वर्षांपासून ही टोळी कार्यरत होती, असे पोलिसांनी सांगितले.

वसीम सलीम शेख (३५), अझहर मुकीम मिर्झा बेग (२२), फिरोज उर्फ ​​जाहिद हुसेन खान (३७), दिलशाद अहमद अली बेग (२८), मुबीन उर्फ ​​एमके जहरीला बाबू रजा खान (२९), आबिद अली अजगर अली शेख (२८) आणि सुशील कुमार छत्रधारी सिंह (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वसीम ‘मशीन’ तर अझहर हा ‘छप्पर देनेवाला’ आहे, फिरोज हा ‘चार्मर’ आणि दिलशाद ‘बूर’ तर इतर ठेकदार आहेत. या अटकेमुळे, एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जून आणि जुलैमध्ये घडलेले दोन गुन्हे आणि अंधेरी पोलिसांकडे नोंदवलेला एक गुन्हा उघडकीस आणला असून गेल्या दीड महिन्यात चोरीला गेलेले १२.७ लाख रुपये किमतीचे १३५ मोबाईल फोन जप्त केले.

‘ओएनजीसी’तील एका कर्मचाऱ्याचा ६ जून रोजी अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ बस थांब्यावरुन बसमध्ये प्रवास करताना या टोळीने ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अशा पद्धतीने चोरला. गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून, हा गुन्हा शिवाजी नगर (गोवंडी) आणि कल्याण भागातील मोबाइल चोरट्यांच्या एका टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावरुन या टोळीला जेरबंद करण्यात आले.

पश्चिम प्रादेशिक विभाग तीनचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक सुनील कारंडे, उपनिरीक्षक किरण नवले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने ‘बेस्ट’ बसेसमध्ये ही टोळी कशा प्रकारे गुन्हे करायची आणि प्रवाशांचे लक्ष विचलित करून त्यांची लूट कशी करायची, याचा अभ्यास केला होता, असेही उपायुक्त नलावडे यांनी सांगितले.