मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात १३ आणि १४ जून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत हायअलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच मुंबई सह ठाण्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २४ तासात २०४.५५ मिमी पेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टीचा पाऊस मानला जातो.

तसेच पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या २४ तास अगोदर ५४ मिमी पावसाची नोंद झाली. म्हसळा येथे सर्वाधिक १०० मिमी पाऊस पडला. एका अधिका्याने ही माहिती दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी करुन जनतेला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे,

पावसाने लावलेल्या ‘ब्रेक’नंतर ‘दादर-कुर्ला’ लोकल सेवा सुरू

मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असून, दिवसेंदिवस जोर वाढताना दिसत आहे. शनिवारीही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच असून, त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं असून, नागरिकांना जपून प्रवास करावा लागत आहे. शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीचं पाणी सायन आणि कुर्ल्यातील रेल्वे ट्रॅक वर आलं होतं. त्यामुळे दादर ते कुर्ला स्थानकादरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. १२ वाजून ५० मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

मुंबईकरांनो, काळजी घ्या… अतिवृष्टीचा इशारा!

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, नागरिकांनी मोठ्या झाडांखाली उभं राहणं टाळावं तसेच बाहेर पडताना स्वताची काळजी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. १३ व १४ जून या कालावधीत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.