मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी बोरिवली आणि कांदिवली स्थानकांचा एकात्मिक पुनर्विकास करण्यात येणार आहे. बोरिवलीतील वाढती गर्दी विभागण्यासाठी कांदिवली स्थानकाला पर्यायी वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत.

नुकताच झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास आराखड्याचा आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय कमी होईल आणि रेल्वे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने कामे करण्यावर त्यांनी भर दिला. बोरिवली हे पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे इंटरचेंज केंद्र आहे. या स्थानकावरून दररोज सुमारे १९१ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जवळपास १,२०० लोकल सेवा चालतात. दररोज सुमारे ३.६५ लाख प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येमुळे स्थानकावरील गर्दी मोठे आव्हान बनली आहे.

पुनर्विकास आराखड्यानुसार बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट उभारण्यात येणार असून जुन्या आणि नव्या फलाटांना जोडण्यासाठी नवीन पादचारी पूल, उद्वाहक, सरकते जिने आणि स्कायवॉक उभारले जाणार आहेत. स्थानकात येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था विकसित केली जाणार आहे. तसेच अधिक रुंद पादचारी मार्ग आणि सुधारित प्रवासी वाहतूक व्यवस्थेची उभारणी केली जाणार आहे.

बोरिवलीतील गर्दी कमी करण्यासाठी कांदिवली स्थानकाचा समांतर विकास करण्यात येणार आहे. रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून कांदिवलीला नव्या वाहतूक केंद्राच्या रूपात विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बोरिवली – विरार पट्ट्यातील प्रवाशांना पर्यायी सुविधा उपलब्ध होणार असून एकाच स्थानकावर पडणारा प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल.

या एकात्मिक पुनर्विकास योजनेअंतर्गत बोरिवली आणि कांदिवली स्थानके मेट्रो, बस आणि रस्ते वाहतुकीशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहेत. दोन्ही स्थानकांवर बहुमजली वाहनतळ, स्वतंत्र पिक-अप व ड्रॉप-ऑफ झोन आणि सुधारित जोडरस्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना घरापासून गंतव्यस्थळापर्यंत अधिक सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही रेल्वेमंत्र्यांनी दिल्या. निश्चित कालमर्यादेत दर्जेदार कामे पूर्ण करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका आणि राज्य सरकारच्या सूचनांचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ही कामे अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत करण्यात येत असून, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवासीभिमुख बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.