मुंबई: रात्री लोकलमधील दिव्यांग डब्यात शिरुन महिला प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अटक आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यांत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
दादर आणि परेल रेल्वे स्थानकांदरम्यान २९ जानेवारीला कीर्तीमाला वराडकर (६०) लोकलच्या दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होत्या. लोकल परेल रेल्वे स्थानक जवळ येताच एका चोरट्याने कीर्तीमाला यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरले आणि चालत्या लोकलमधून उडी मारून पळ काढला. याबाबत महिलेने दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले असता, एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून रेल्वे रुळावरून पळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
दरम्यानच्या काळात अशाच प्रकारच्या घटना ठाणे, बोरिवली आणि वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या होत्या. या प्रकरणांमधील आरोपीचा पेहराव दादर घटनेतील आरोपीप्रमाणे असल्याने हा एकच आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने या आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी अनेक दिवस परेल रेल्वे स्थानक परिसरात पाळत ठेवली. दरम्यान, पोलिसांना २१ फेब्रुवारीला हा आरोपी परेल रेल्वे स्थानकात आढळला. पोलिस पथकाने तात्काळ झडप घालून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच ठाणे, बोरिवली आणि वाशी परिसरातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
