Mumbra Thane Train Accident मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून प्रवास करणारे सुमारे १३ जण पडल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. लोकलमधील भरगच्च गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून खाली पडतात. रेल्वे प्रशासनाचे हे खूप मोठे अपयश आहे. मुंब्रा येथे घडलेल्या अपघाताची जबाबदारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी घ्यावी. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

डोंबिवली ते ठाणे दरम्यान प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातुलनेत लोकलच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत मुंबई रेल्वे प्रवासी संघाने अनेकवेळा विभागीय रेल्वे व्यवस्थापक, महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंडळाशी दिवा ते कळवा या जीवघेण्या मार्गाबाबत तक्रार केली आहे. तसेच या मार्गावर यापूर्वीही अनेक प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशानाने तेथे ठोस उपाययोजना केली नाही. मात्र, डीआरएम यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले आहे. सोमवारची घडलेली दुर्घटना ही लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या विलंबामुळे झाली. त्या रेल्वेगाड्यांना दिलेल्या प्राधान्यामुळे घडलेली आहे. या कारणामुळे लोकलमधील गर्दी आणि प्रवाशांचा प्रवास असुरक्षित होतो.

या दुर्घटनेत १३ प्रवासी पडले असून यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  उर्वरित प्रवासी जखमी आहेत. त्यातील दोन गंभीर आहेत. त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज, कळवा येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुर्घटनेतील जखमींना तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी. तसेच मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी. यासह कल्याण ते कुर्ला दरम्यान लोकलसाठी चार मार्ग राखून ठेवावेत. गर्दीच्या वेळेत मेल, एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गांचा अवलंब करणे. या दुर्घटनेची जबाबदारी डीआरएम यांनी स्वीकारावी. तसेच रेल्वे मंडळाने मुंबई लोकल रेल्वे व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि मुंबई लोकलसाठी स्वतंक्ष आणि स्वायत्त संस्था निर्माण करावी. – सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ