मुंबई : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘सायबर जनजागृती महिना’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या संदेशासह मुंबई रेल्वे पोलिसांकडून रेल्वे प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये महिनाभर जनजागृती केली जाणार आहे.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपआयुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार; तसेच सायबर सेलमधील अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेत ‘डिजिटल अरेस्ट’, केवायसी आणि यूपीआयच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन कर्ज अॅप, बनावट खरेदी संकेतस्थळे, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, वीज-पाणी-गॅस सेवांच्या नावाखाली होणारी फसवणूक; तसेच विवाह संकेतस्थळांवरील फसवणूक अशा विविध प्रकारांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. दोन टप्प्यांतील प्रमाणीकरण (एमएफए), अॅप अद्ययावत ठेवणे, अनावश्यक अॅप हटविणे, माहितीचा सुरक्षित बॅकअप आणि गोपनीयता सेटिंग्ज याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. केवळ समाजमाध्यमांवरील जनजागृतीपुरती मोहीम मर्यादित न ठेवता शाळा, महाविद्यालये, रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
नवरात्रीत दररोज एका धोक्यावर लक्ष
नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज एका विशिष्ट सायबर धोक्यावर लक्ष केंद्रित करून जनजागृती केली जाणार आहे. त्यात डिजिटल अरेस्ट, साईडलोडेड एपीकेमधून होणारे मालवेअर; तसेच वीज, गॅस आदी सेवांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा समावेश आहे. सायबर फसवणुकीच्या पीडितांना तातडीने मदत मिळावी यासाठी ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’ आणि ‘ग्रिव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम’अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावाही घेतला जाणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉन किंवा सायक्लोथॉनच्या आयोजनाने मोहिमेची सांगता करण्यात येणार आहे.
सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राइमच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. ‘थांबा. विचार करा. पडताळणी करा. मगच क्लिक करा.’ हा संदेशही या मोहिमेतून देण्यात येत आहे.
रेल्वे स्थानके आणि परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने सायबर गुन्हेगारांकडून विविध प्रकारच्या फसवणुकीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला आहे.
या मोहिमेत अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा क्रेडिट कार्डचा तपशील, ओटीपी, पासवर्ड अथवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये, असा संदेश देण्यात आला आहे. मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, संशयास्पद संदेश किंवा दूरध्वनीला प्रतिसाद न देणे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
