मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या प्राणघातक अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील एकूण ३८ अपघातप्रवण ‘हॉटस्पॉट्स’ची निवड करण्यात आली असून, या ठिकाणांचे पालकतत्त्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहे.
मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असल्याने रेल्वे प्रवासातील मृत्यूंचा आकडा वाढत आहे. काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी किंवा इच्छित लोकल पकडण्यासाठी अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. यात अनेकांचा मृत्यू होतो, तर काहीजण गंभीर जखमी होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृतीचा दुहेरी आराखडा तयार केला आहे.
मध्य रेल्वेतील २७ आणि पश्चिम रेल्वेतील ११ अशा एकूण ३८ हॉटस्पॉट्सची ओळख पटवण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे); तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीएसएमटी, कल्याण, वांद्रे, हार्बर आणि वसई विभाग यांनी या ठिकाणांची जबाबदारी स्वीकारली असून, प्रत्येक ठिकाणच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना
या मोहिमेअंतर्गत स्थानकांवरील अनधिकृत प्रवेशद्वार बंद करणे, आवश्यक ठिकाणी सुरक्षा जाळीची उंची वाढवणे, तुटलेल्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणे आणि कमी उंचीच्या भिंती उंच करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रवाशांसाठी पादचारी पूल, भुयारी मार्ग, उड्डाणपूल उभारण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
जनजागृतीवरही भर
रेल्वे रुळ ओलांडू नयेत, यासाठी यापूर्वी रेल्वे प्रशासनाने ”शून्य मृत्यू मोहिम” अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत. ”यमराज”च्या वेशातील सुरक्षा जवानांमार्फत संदेश देणे, पादचारी पूल, सरकते जिने आणि लिफ्टचा वापर करण्याचे आवाहन करणे असे उपक्रम राबवण्यात आले होते. आता या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. स्थानकांवर ”खाकी सखी” उपक्रम, सुरक्षा संदेशांचे बॅनर, लाऊडस्पीकरवरील सूचना, पथनाट्य, तसेच शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्टी भागात प्रत्यक्ष जाऊन जनजागृती केली जाणार आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून रेल्वे रुळ ओलांडून होणारे अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
