मुंबई : रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीच्या (पीआरएस) तांत्रिक देखभाल-दुरूस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतून गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. सलग सुट्ट्या आणि गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी अनेकजण गावी जाण्याची तयारी करत आहेत. मात्र, आरक्षण प्रणाली बंद होणार असल्याने, रेल्वे तिकीट मिळवणे सध्या अवघड होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी गावी जाण्याचे बेत आखले आहेत. सुट्टीनिमित्त अनेकजण सर्व सामानासह गावी जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ऐनवेळी प्रवाशांना रेल्वेचे तिकीट काढणे अवघड होणार आहे. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार असल्याने काही काळ प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही.

सिस्टम पॅरामीटर ट्युनिंगच्या कामासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. ही प्रणाली शनिवारी रात्री ११.४५ पासून ते मध्यरात्री ०२.४५ पर्यंत बंद राहील. त्यामुळे प्रवाशांना यादरम्यान इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाही. इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस), चार्ट डिस्प्ले, तात्काळ आरक्षण, टच स्क्रीन, रिफंड काऊंटर्स व कोचिंग रिफंड टर्मिनल या सेवा उपलब्ध नसतील. याशिवाय इंटरनेट ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध होणार नाही. तथापि, रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी तिकीट जमा पावती (टीडीआर) जारी केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे दिली. या कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना तिकिटे काढता येणार नसल्याने त्यांची गैरसोय होईल.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २०० हून अधिक आरक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या रेल्वेगासाठी एक लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले. यावर्षी मध्य रेल्वेने एकूण २६२ गणपती विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या २६२ फेऱ्यांमध्ये २०० आरक्षित विशेष रेल्वेगाड्यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य डब्यांच्या मिश्र रचनेसह; तसेच ६२ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या रेल्वेगाड्या मुंबई, पुणे आणि नागपूरहून कोकणातील विविध ठिकाणांसह गोव्यापर्यंत धावणार आहेत. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०० आरक्षित विशेष रेल्वेगाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२ फेऱ्या, रत्नागिरीसाठी ६४ फेऱ्या आणि मडगावसाठी २४ फेऱ्या आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना आगाऊ नियोजन करून, मूळगावी जाऊन कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करणे अधिक सोयीचे होणार आहे.