मुंबई : लोकल आणि रेल्वे परिसरात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिराती चिकटवल्याप्रकरणी एका बंगाली बाबाला मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) संयुक्त पथकाने मंगळवारी अटक केली. आरपीएफने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. रे रोड दारूखाना येथील मीरा अली दर्गा येथे संयुक्त छापा टाकला. छाप्यादरम्यान, मोहम्मद नझीर अंदारी नावाच्या एका आरोपीला अटक केली.
लोकल आणि रेल्वे परिसरात जाहिराती प्रसिद्धीसाठी बनवलेले सुमारे १५ हजार छापील पोस्टर्स या छाप्यात जप्त करण्यात आले. रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक उपक्रम राबवण्यासाठी आणि रेल्वेच्या कोचसह रेल्वे परिसराचा प्रचारासाठी वापर करत असल्याचे आरोपीने चौकशीत मान्य केले. कलम १४४, १४५ (ब), १४७ आणि १६६ अंतर्गत सीआर क्रमांक १०४/२०२६ नुसार वडाळा येथे गुन्हा दाखल आहे.
बंगाली बाबाच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू
सखोल चौकशीत इतर संशयितांचा रेल्वे डब्यांमध्ये प्रचार साहित्य छापण्यात आणि चिकटवण्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले. संबंधित सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे. पोस्टर्स चिटकवणाऱ्या संशयित छपाई संस्था आणि व्यक्तींशी संबंधित आर्थिक व्यवहारांचेही तपशीलवार विश्लषण केले जात असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
अनधिकृत जाहिरात करणे, रेल्वे मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे आणि त्याचा गैरवापर करणे या बाबी रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहेत. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी व्यक्ती आणि गटांवर कठोर कारवाई केली जाईल.– डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

