मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या एकूण अतिरेकी व दहशतवादी घटनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक घटना या मुंबई लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी सांगितले. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीसह दहशतवादी घटनांना रोखण्यासाठी प्रत्येक पोलिसाने सक्रिय राहून कर्तव्य पार पाडावे, असे बुरडे म्हणाले.
गृह विभागाने ३ मार्च २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ आणि भाईंदर या चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मान्यता दिली होती. त्यापैकी अंबरनाथ पोलीस ठाणे आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होत आहे. अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाण्याच्या उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. उद्घाटन कार्यक्रमास ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, मध्य परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे, कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक तरुण कुमार, मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राहुल राज उपस्थित होते.
यावेळी बुरडे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांच्या काळात रेल्वे परिसरात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तब्बल २७२ नागरिकांचा मृत्यू झाला असून १,२२० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर १९९० मध्ये झालेल्या पहिल्या स्फोटापासून ते २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यापर्यंतची मालिका पाहिली असता, महाराष्ट्रातील अतिरेकी कारवायांचे मुख्य लक्ष्य मुंबईचे रेल्वे जाळे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी ३,२३४ फेऱ्यांमधून प्रवास करतात. एवढ्या मोठ्या जनसमुदायाची सुरक्षा ठेवणे हे अत्यंत कठीण काम आहे. अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या रेल्वे पोलीस ठाण्यात एक पोलीस उप-निरीक्षक, एक श्रेणी पोलीस उप-निरीक्षक आणि ५१ पोलीस अंमलदार कर्तव्यास असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रवाशांशी चांगला संवाद ठेवल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत
मुंबई उपनगरीय रेल्वे जाळ्यात दररोज २७० रेकच्या माध्यमातून ३,२३४ फेऱ्या होतात आणि ७५ ते ८० लाख नागरिक प्रवास करतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. फलाटावर तैनात पोलिसांमुळे प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होते. प्रवाशांशी चांगला संवाद ठेवल्यास गुन्हेगारी रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळण्यास मदत होते. महिलांविरोधात होणाऱ्या विनयभंग व तत्सम गुन्ह्यांवर अत्यंत गांभीर्याने कारवाई केली जात आहे. अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाणे सुरू झाल्यामुळे कल्याण आणि ठाणे परिसरातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास बुरडे यांनी व्यक्त केला.
