मुंबई : सलग दोन दिवस दुर्घटनांमध्ये एका शाळकरी मुलासह दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी गुरुवारी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर, संबंधित कंत्राटदार आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. तसेच घाडी यांनी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे यामागे राजकारण असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. घाडी यांच्या मागणीनंतर लगेचच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आयुक्तांची पाठराखण केली आहे.

मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच दोन दिवसात तीन विविध दुर्घटनांमध्ये तिघांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर गुरुवारी साकीनाका येथे एका व्यक्तीचा मनुष्य प्रवेशिकेत पडून मृत्यू ओढवला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. घाडी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मदतकार्यामध्ये झालेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत, अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

“मुंबईकरांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे,” असेही उपमहापौर संजय घाडी यांनी स्पष्ट केले. तसेच आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगत दुर्घटनाग्रस्तांना तातडीने सर्वतोपरी मदत मिळावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडून आयुक्तांची पाठराखण

साकीनाकाची दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण या दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरले जाणे कितपत योग्य आहे असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे. स्थानिक हलगर्जीपणा आधी तपासला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केला आहे.

अश्विनी भिडे यांचे स्पष्टिकरण

कुठल्याही बाबतीत प्रशासन जबाबदार असतेच. त्यामुळेच प्रशासनाने ही कारवाई केली आहे. वैयक्तिक आयुक्तांना जबाबदार धरले जात असेल तर प्रत्येक जागेवर जाऊन आयुक्त पाहणी करू शकत नाही. परंतु, मनुष्य प्रवेशिकांचा सातत्याने आढावा घेतला आहे. प्रत्येक बैठकीत मनुष्य प्रवेशिकांचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर असतो. सविस्तर सादरीकरण प्रत्येक विभागाने केले आहे. किती मनुष्यप्रवेशिका आहेत, कितीवर जाळ्या लावायच्या आहेत याचा आढावा नियमित घेतला जात होता. आताही खास मोहीम घेऊन प्रत्येक मनुष्य प्रवेशिकांची १०० टक्के पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.