मुंबई : मुसळधार पावसाचा फटका रविवारी उपनगरीय लोकल, रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीलाही बसला. पाऊस आणि खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील धावपट्टी सकाळी एक तास बंद ठेवण्यात आली होती. दिवसभरात ४ विमाने रद्द तर मुंबईत येणाऱ्या १३ विमानांच्या मार्गात बदल करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

मुंबईसह परिसराला रविवारी मुसळधार पावसाचा इशारा ( रेड अर्लट ) देण्यात आला होता. पावसामुळे इंडिगोची दिल्ली-मुंबई, इंदौर-मुंबई अप आणि डाउन मार्गावरील प्रत्येकी दोन-दोन अशी एकूण चार विमाने दिवसभरात रद्द करण्यात आली होती. मुंबईत येणारी १३ विमाने इतरत्र वळवण्यात आली होती. वळवण्यात आलेली विमाने पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा मुंबई विमानतळावर आली.

रविवारी सकाळी १०:१७ वाजता, खराब हवामानाचा धावपट्टीच्या कामकाजावर परिणाम झाला. मुंबई परिसरात ४२ नॉट्सपर्यंतचे जोरदार वारे वाहात होते, तसेच मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली होती. नियमावलीनुसार, प्रवासी, विमान आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांची सुरक्षा यांचा विचार करून धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले. हवामानात सुधारणा झाल्यानंतर, सकाळी ११:१७ वाजता धावपट्टीवरील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले. कामकाज तात्पुरत्या स्वरूपात एकूण १तास थांबवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची विमानतळावर गर्दी झाली होती.