मुंबई : मुंबईत मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी रात्रीतही शहारासह उपनगरातही संततधार आहे. काही सखल भाग पाण्याखाली गेल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. अनेक भागात रात्रीपासून १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील तीन तासात शहरातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून सकाळी १० पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतील उपनगरातही पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत तर काही सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. यात दादर येथील हिंदू कॉलनी, अंधेरी पश्चिम येथील काही भाग आदी भागांसह इतर भागांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवार सकाळी ८ ते गुरुवार सकाळी ६ या वेळेत मुंबई शहरात १२४ मिमी, पूर्व उपनगरात १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मुलुंड येथे सार्वधिक २१८ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ३ जुलैच्या आसपास बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच, मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार आजपासून पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात बहुतांश ठिकणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ५ जुलैपर्यंत राज्याच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्रात वादळी हवामान राहण्याची शक्यता असून या दरम्यान ताशी ४० ते ५० किमी वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

कुठे किती पाऊस ?

१ जुलै सकाळी ८:३० ते २ जुलै सकाळी ५:३० पर्यंत नोंदला गेलेला पाऊस

सांताक्रूझ – १६५ मिमी

जुहू विमानतळ – १६४ मिमी

विक्रोळी – १६३ मिमी

राम मंदिर – १५७ मिमी

वांद्रे – १४१ मिमी

विद्याविहार – १३२ मिमी

शीव – ११५ मिमी

टाटा पॉवर चेंबूर – ९९. मिमी

कुलाबा – ९९ मिमी

भायखळा – ९७.५ मिमी