मुंबई : मागील एक आठवड्यापासून मुंबईत पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम येथील जनजीवनावर होत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळीही काही भागात पावसाचा जोर कायम असून पुढील तीन तास मुंबईसह ठाण्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला असून काही भागात दिवशभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, बुधवारी हवामान विभागाकडून कोणताही इशाला मुंबईला देण्यात आलेला नाही.

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळपासून काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासापासून मुंबईत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच काही भागात १५० मिमीहून अधिक पाऊस नोंदला गेला. किनारपट्टी भागावर ढगांचा एक लांब पट्टा सॅटेलाईट छायाचित्रात दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ७६ किलोमीटर प्रतितास वादळी वाऱ्यांची नोंद होत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात वाऱ्यांचा वेग अधिक आहे. तसेच अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत

मुंबईत यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने जुलैच्या सुरवातीपासूनच दमदार हजेरी लावली. अवघ्या पाच दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात जुलै महिन्याच्या सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारपासून मुंबईसह कोकण पट्ट्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईसह, पश्चिम उपनगरे तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कायम आहे.

दरम्यान, मागील सात दिवसांत हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ९८९.६ मिमी, तर कुलाबा केंद्रात ८८०.६ मिमी पावसाची नोंद झाली. संपूर्ण जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस सोमवारीच मुंबईत नोंदला गेला. तसेच १ जून ते ७ जुलै यादरम्यान हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १४०६ मिमी, तर कुलाबा केंद्रात १३२१ मिमी पाऊस नोंदला गेला. संपूर्ण कोकण किनारपट्टीत यादरम्यान अधिक पाऊस नोंदला गेला. मुंबईसह उत्तर कोकणात पावसाची तीव्रता अधिक होती. पुढील काही दिवसात पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.