मुंबई : मुंबईत रविवारपासून वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बुधवारी पहाटेपासून शहरात आणि उपनगरात काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून मुंबईत बुधवारी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शहरात आणि उपनगरातील काही ठिकाणी बुधवारी पहाटेपासून पावसाळी हवामान आहे. केरळ येथे गुरुवारी मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात सध्या वादळी पावसाची स्थिती असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईत यंदा मे महिना कोरडा गेला. त्यानंतर आता हळूहळू मान्सून पूर्व घडामोडींना वेग येताना दिसत आहे.
शहरात मंगळवारीही उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली तसेच तापमानाचा पार ३६ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारपासून मुंबईत वळवाच्या पावसाचा जोर काहीसा वाढेल, असा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
पावसाची नोंद कुठे?
शहरात आणि उपनगरात बुधवारी पहाटेपासून वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. काही भागात पावसाचा जोर अधिक असून काही भागात गडगडाटासह पावसाची नोंद होत आहे. यात अंधेरी, खार, वांद्रे, बोरिवली, मालाड, गोरेगाव, वर्सोवा, विलेपार्ले, जुहू आदी भागात पाऊस झाला. याच बरोबर ठाणे तसेच मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातील काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या. सध्या मुंबई शहर आणि उपनगरासह अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, शहरात आणि उपनगरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील तसेच मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या वादळी पावसामुळे कमाल तापमानात घट नोंदली जात असून नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे लक्ष सध्या मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. केरळ येथे गुरुवारी मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. केरळ येथे गुरुवारी पाऊस दाखल झाल्यास तसेच हवामान अनुकूल राहिल्यास, पुढील काही दिवसात राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
