मुंबई : शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले.अंधेरी परिसरातील रस्त्यांना अक्षरश: नद्यांचे स्वरुप आले होते. मोगरा नाला तुडूंब भरल्यामुळे अंधेरी पश्चिम परिसरातील बहुतांश सर्वच रस्ते जलमय झाले होते. अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर अंधेरी लोखंडवाला परिसराकडे जाणारे सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते. दरम्यान, मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे अंधेरीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने मुंबईत शनिवारी रेड अलर्ट दिला होता. त्यातच दुपारी पावणेतीन वाजता समुद्राला मोठी भरती आली होती. त्यावेळी समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे भरतीचे पाणी शहरात शिरले. मुंबईत सर्वच विभागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. मात्र अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील ओसंडून वाहू लागले. त्यामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. पाण्याचा प्रवाह इतका वेगत होता की त्यातही लाटा उसळत होत्या.
अंधेरी परिसरात सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत दीडशे मिमी पावसाची नोंद झाली. मोगरा नाला तुडूंब भरल्यामुळे अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. अंधेरी भुयारी मार्गावर (अंधेरी सब वे) अवजड वाहनांनाही प्रवेश बंदी करण्यात आली होती.
मोगरा नाला उदंचन केंद्राचे कामही रखडलेलेच
पश्चिम उपनगराची पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मोगरा उदंचन केद्रांचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता. त्यापैकी हाजीअली, ईर्ला, लवग्रोव, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रे बांधून कार्यान्वित झाली. मात्र अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे काम रखडले होते. हे उंदचन केंद्र बरीच वर्षे विविध कारणामुळे रखडले आहे. त्यामुळे अंधेरी परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
अंधेरी, जोगेश्वरी, मालपाडोंगरी ते वर्सोवा या भागातील ७.४३ चौ. किमी. क्षेत्रामधील पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मोगरा नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात उदंचन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. त्याकरीता २९० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे २०२१ मध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र पाच वर्षे प्रकल्प रखडल्यामुळे अंधेरीतील रहिवाशांना त्रास सोसावा लागत आहे.
