मुंबई : मान्सूनच्या पावसाला अद्याप वेळ असला तरी बुधवारी सकाळी मुंबई वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. शहर भागापेक्षा पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस पडला. अंधेरी – बीकेसीदरम्यानच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तासाभराच्या पावसामुळेही अंधेरी सब वे सुमारे पाऊण तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मुंबईत बुधवारी सकाळी सात वाजता पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पाऊस कोसळला. शहर भागापेक्षा पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. शहर भागात ०.९६ मिमी, पूर्व उपनगरात १.२५ मिमी, तर पश्चिम उपनगरात ९.८४ मिमी पावसाची नोंद झाली.
शहर भागात सर्वाधिक पाऊस काळाकिल्ला परिसरात १० मिमी, तर पूर्व उपनगरात चेंबूर येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र पश्चिम उपनगरात अंधेरी, वर्सोवा येथे सर्वाधिक ६९ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कूपर रुग्णालय (५२ मिमी), अंधेरी पूर्व (४९ मिमी), मालपा डोंगरी (३९ मिमी), विलेपार्ले (३३ मिमी) सांताक्रूझ (३० मिमी), चकाला (१७ मिमी ) पावसाची नोंद झाली.
अंधेरी सब वे बंद
तासाभराच्या पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी तुंबले होते. त्यामुळे पाऊण तासासाठी अंधेरी सब वे बंद करावा लागला. थोडासा पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये पाणी साचते व हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षांत या समस्येवर मुंबई महापालिकेला तोडगा काढता आलेला नाही. हिंदमातामध्ये उपाययोजना करून अखेर पाण्याचा निचरा करण्यात पालिकेला काही अंशी यश आले. पण अंधेरी सब वेचे भौगोलिक कोडे पालिकेला अद्याप सोडवता आलेले नाही. यावर्षी पाऊस सुरू होण्याच्या आधीच बुधवारी पहिल्यांदा सब वे बंद करावा लागला. संपूर्ण पावसाळ्यात तब्बल २५ ते ३० वेळा सब वे वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येते.
मुंबईत इतर ठिकाणी पाणी साचले की त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मात्र अंधेरी सब वेमध्ये पाणी साचले की त्यात मोठा धोका असतो. उतारावरून वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे चारचाकी गाडीही वाहून जाऊ शकते. अंधेरी सब वे परिसर हा सखल भाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडतो तेव्हा प्रति सेकंद ५० हजार लिटर पाणी जोराने वाहत येत असते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे सब वेमध्ये पाणी साचले की तत्काळ वाहतूक बंद करावी लागते. सध्या तरी वाहतूक बंद करणे हाच उपाय असून अंधेरी सब वेमध्ये हिंदमाताप्रमाणे भूमिगत टाकी बसवूनही फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे सर्व शक्यता पडताळून बघितल्या जात असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
