मुंबई : मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक भागांत पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे शहराची गती मंदावली आहे. याचा मोठा फटका बेस्टच्या बससेवेला बसला असून अनेक बस इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत, तर काही बससेवा रद्द कराव्या लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याने आणि झाडे उन्मळून पडल्यामुळे बेस्ट सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक भागांतील डझनभर बसमार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सखल भागांत पाणी साचल्यामुळे काही बेस्ट बस अचानक बंद पडल्याने सायन आणि किंग्ज सर्कलसारख्या भागांत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
झाडे उन्मळून पडल्यामुळे आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाकडून अनेक प्रमुख बसमार्ग पर्यायी मार्गांवर वळवण्यात आले आहेत. बससेवा विस्कळीत झाल्याने आणि बसेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांना बसथांब्यांवर तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. भांडुप (पश्चिम), अंधेरी, विद्याविहार, कुलाबा, मुलुंड, ९० फूट रोड, आदर्श नगर आणि गोरेगाव या भागांत झाडे उन्मळून पडली आहेत.
त्यामुळे या भागांतील बेस्टची वाहतूक कोलमडली आहे. शहरातील सुमारे ६४ मार्गांवरील बेस्टची वाहतूक विस्कळीत झाली आहे. उपनगरीय लोकलची वाहतूक विलंबाने सुरू असल्याने आणि काही स्थानकांत पाणी भरल्याने प्रवाशांनी बेस्टच्या बसकडे मोर्चा वळविला. मात्र, बेस्टच्या वाहतुकीचेही तीनतेरा वाजल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
