मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत सातत्याने पाऊस कोसळत आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी भर पावसात रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पोलिस, रेल्वे कर्मचारी मुंबईकरांचे जनजिवन सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही कुटुंबाची चिंता न करता जीवाची जोखीम पत्करून अत्यावश्यक सेवेतील कामगार – कर्मचारी मुंबईकरांच्या सेवेत अहोरात्र राबत आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचारी हे पालिकेतील अत्यंत महत्वाचा घटक आहेत. पावसाचा जोर वाढला की त्यांच्या कामाचा ताणही वाढतो. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात घरापासून दूर राहून अनेक स्वच्छता कामगार सेवा बजावत आहेत. त्यातील राहुल पवार हे एक.
गेल्या २० वर्षांपासून ते महापालिकेचे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी पहाटे पाच वाजता पनवेल येथून घरातून बाहेर पडलेले पवार सोमवारी रात्री उशिरापर्यंत सेवा बजावत होते. रविवारी दुपारी मी आणि सहकारी काम करत असताना आमच्या बाजूलाच भलीमोठी झाडाची फांदी पडली. आम्ही थोडक्यात वाचलो, असे पवार यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत जीव मुठीत घेऊन आम्हाला काम करावे लागते. सतत धाकधूक असते. पाण्याचा निचरा होत नसल्यास अनेक वेळा हातानेच स्वच्छता करावी लागते. हाताला चिकटलेल्या घाणीच्या वासामुळे जेवणही जात नाही. मंगळवारी सकाळी ६.३० ला कामावर हजर राहण्याचा शब्द देऊन वरिष्ठांकडून सोमवारी रात्री घरी जाण्याची परवानगी घेतली आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, आमचे प्रश्न, समस्या, अडचणी समजून महापालिका प्रशासनाने त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा राहुल पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबईतील जनजीवन सामान्य ठेवण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांबाबत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी समाधान व्यक्त केले.
समुद्रकिनारी ”वादळातील रक्षक”
मुसळधार पावसातही मुंबई पोलिस ठिकठिकाणी ऑन ड्युटी २४ तास कार्यरत आहेत. मुंबईच्या समुद्रकिनारी गस्त घालणाऱ्या पोलिसाचा फोटो शेअर करत पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी ”वादळातील रक्षक” अशी उपमा दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडांची पडझड सुरू असते. अशा वेळी वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे आणि आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी मुंबई पोलिस पार पाडतात. या पावसातही शहरात पोलिस कंबरेपर्यंतच्या पाण्यात स्वतः उतरून नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना मदत करताना दिसत आहेत. पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या ”वादळातील रक्षक” या एका ओळीतून मुंबई पोलिसांच्या निस्वार्थ सेवेला आणि कर्तव्यभावनेला योग्य शब्दांत दाद मिळाली आहे.
मुसळधार पावसात आणि पूरपरिस्थितीत सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून २४ तास कर्तव्य बजावतात. रहदारी सुरळीत ठेवण्यासोबतच, पाण्यात अडकलेल्या गाड्यांमधून प्रवाशांची सुटका करणे, लहान मुलांना कडेवर घेऊन रस्ता ओलांडून देणे, आणि आपत्कालीन स्थितीत मदत करतात. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाट काढताना वृद्ध आणि शाळकरी मुलांना पोलीस स्वतःच्या खांद्यावर किंवा कडेवर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात.
