मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास चर्चगेट परिसरातील बी मार्गावर भलेमोठे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काही वाहनांचे मार्ग नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत झाड आणि फांद्या पडण्याच्या तब्बल ९९ घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

झाड पडल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. सद्यस्थितीत झाडांच्या फांद्या तोडून बाजूला सारण्याचे काम केले जात आहे. या घटनेमुळे बी मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, संबंधित झाड खासगी जागेत असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या २४ तासांत शहर विभागात ३६, पूर्व उपनगरात २५ व पश्चिम उपनगरात ३८ अशा एकूण ९९ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने त्या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच, शहरात ७, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तसेच, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरात प्रत्येकी तीन अशा सहा ठिकाणी घराचा, भिंतीचा भाग पडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

रस्ते पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहेत. मुंबई शहर व उपनगरात मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे शहरातील हिंदमाता, सायन रोड नं. २४, सक्कर पंचायत, नॅशनल ओल्ड मार्केट वडाळा, दादर टी टी, परळ टी टी, गोल देऊळ डी बी मार्ग, नूर मोहम्मद मस्जीद चेंबूर, फाईन आर्ट गॅलरी चेंबूर, एससीएलआर ब्रिज खाली चेंबूर या ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले होते. स्थानिक उदंचन संच, मनुष्यबळाच्या सहाय्याने सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरीता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार व काही वेळेस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.