मुंबई : गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादरच्या मीनाताई ठाकरे फूल बाजार परिसरातील एक भलेमोठे झाड शुक्रवारी मध्यरात्री पडून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुर्घटना रात्री घडल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र फूल व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, वाढत्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे झाडे पडण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असून शनिवारी मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यातच अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. मंगळवारी चेंबूर येथे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर पडून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दररोज दिवसभरात झाड किंवा फांदी पडण्याच्या तब्बल ८० ते ९० तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे येत आहेत. शुक्रवारपासून शनिवारी दुपारपर्यंत झाड किंवा फांद्या पडल्याच्या सुमारे सव्वाशे तक्रारींची पालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे नोंद झाली.

दादरसारख्या वर्दळीच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झाड पडल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दादर फूल बाजार हा नेहमीच गजबजलेला असतो. या भागात झाड पडल्यानंतर स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून बाजार परिसरातील सर्व झाडांची छाटणी करण्याची, तसेच दादरमधील सर्व झाडांची पाहणी करण्याची सूचना किल्लेदार यांनी केली. दादर फूल बाजार परिसरात मध्यरात्री १२ नंतर घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. माल आणणे, उतरणे ही कामे सुरू होतात. मात्र त्याच्या आधीच ही दुर्घटना घटल्यामुळे जीवितहानी टळल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. मात्र जवळच एका दुकानाच्या माळ्यावर एक व्यक्ती झोपली होती, ती थोडक्यात बचावल्याचेही त्यांनी सांगितले.

काँक्रीटीकरणामुळे झाडे पडण्याच्या घटनांत वाढ दरम्यान, या वर्षी झाड पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मत किल्लेदार यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केल्यामुळे आणि सिमेंटचे रस्ते करत असताना हरित लवादाच्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुर्घटना घडत असल्याचे ते म्हणाले. साधारण झाडांच्या भोवती १ चौरस मीटर भागात खोदकाम करायचे नसते. पण या नियमाचे पालन होत नसल्यामुळे या घटना घडत असल्याचे किल्लेदार म्हणाले.

पावसामुळे भिजलेल्या झाडाचे वजन वाढते व त्यामुळे झाडे एकाबाजूला कलतात. तसेच झाड आतून खराब झाले असेल तर ते बाहेरून समजू शकत नाही, असे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.