मुंबई : हवामान विभागाने मंगळवारी मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. मात्र पश्चिम उपनगरातील एका शाळेने सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सुटी दिली, तर पाऊस कमी झाल्याने दुपारच्या सत्रातील शाळा भरवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे शाळेतील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने मुसळधारा कोसळत आहेत. हवामान विभागाने सोमवारपाठोपाठ मंगळवारीही शहरामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सोमवारी रात्री उशीरा शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर केली. त्यानुसार मुंबईतील सर्वच शाळा व महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती.
कांदिवलीतील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलनेही विद्यार्थ्यांना मंगळवारी सुटी जाहीर केली. त्यानुसार सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरली नाही. मात्र मंगळवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने शाळा प्रशासनाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दुपारच्या सत्रातील शाळा सुरू असल्याचा संदेश व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे पाठविला. तसेच दुपारच्या सत्रातील विद्यार्थांना आणण्यासाठी त्यांनी स्कूलबसही पाठविली. ऐनवेळी शाळा प्रशासनाकडून आलेल्या या संदेशामुळे पालकांची तारांबळ उडाली.
पाऊस कमी असला तरी दुपारनंतर अचानक पावसाचा जोर वाढल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता. महानगरपालिका प्रशासानने सुटी जाहीर केली असतानाही शाळा प्रशासनाने दुपारचे वर्ग भरविल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलने दुपारच्या सत्रातील वर्ग भरविल्याने काही पालकांनी तसेच ग्लोबल पॅरेंट्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनीही यासंदर्भात पश्चिम विभागीय शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार केली. तसेच शाळा शासन निर्णयाचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पालकांच्या तक्रारीची दखल घेत पश्चिम विभागीय शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी संबंधित शाळा प्रशासनाला दूरध्वनी करून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांना सुटी देण्याचे आदेश दिले. जावीर यांच्या सूचनेनंतर दुपारी २.३० वाजता शाळा प्रशासनाने संबंधित पालकांना बोलवून विद्यार्थ्यांना घरी सोडले.
जावीर यांनी यासंदर्भात शाळा प्रशासनाची चौकशी केली. प्रशासनाने सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुटी दिली होती. मात्र सकाळपासून पाऊस नसल्याने काही पालकांनी स्वत: येऊन शाळा सुरू करण्याची विनंती केली. त्यामुळे आम्ही दुपारचे वर्ग भरवल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिल्याचे जावीर यांनी सांगितले. यासंदर्भात शाळा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
पश्चिम उपनगरातील अन्य दोन शाळांमध्ये भरले वर्ग
मुंबई महानगरपालिकेने सुटी जाहीर केली असली तरी ओशिवारा येथील रायगड पब्लिक स्कूल आणि पाटकर महाविद्यालयामध्ये सकाळचे वर्ग भरविण्यात आले हाेते. या शाळा व महाविद्यालयालय प्रशासनाला रात्री उशीरा सुटीचे पत्रक मिळाल्याने त्यांनी वर्ग सुरू ठेवले हाेते. मात्र शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी दूरध्वनी केल्यानंतर त्यांनी तातडीने शाळा व महाविद्यालय बंद केले.
