मुंबई : जोगेश्वरीतील आंबोली येथील मटर पाडा परिसरात रविवारी मध्यरात्री २.३४ च्या सुमारास काही घरांवर मोठे झाड पडल्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेत एकूण सातजण जखमी झाले असून त्यात एका गर्भवती महिलेचाही समवेश आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असून सद्यस्थितीत त्यांच्यावर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी मुंबईत तब्बल २९१ ठिकाणी झाड पडल्याच्या घटनांची नोंद झाली.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विविध कारणांनी झाड पडण्याच्याही घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एका आठवड्यात झाड पडून तिघांचे बळी गेले. झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दोघांचा रविवारी जीव गेला. त्यानंतर काही तासांतच मध्यरात्री अडीचच्या सुमारास आंबोलीतील अशोक ब्रह्मा चाळीतील काही घरांवर भलेमोठे झाड पडले. त्या दुर्घटनेत रिंकू कनोजिया (२५), मयंक कनोजिया (१२), सुमित झगडे (२०), संजीवनी झगडे (४८), दत्तात्रय पांचाळ, रोहिणी बिलारे, संदीप बिलारे आदी जखमी झाले. जखमींपैकी दत्तात्रय, रोहिणी, संदीप यांना किरकोळ मार बसल्याने त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. उर्वरित जखमींना नजीकच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे चाळीतील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच, वारंवार झाड पडण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सोमवारी मुंबई शहरात ७४, पूर्व उपनगरात ७८ आणि पश्चिम उपनगरात १३९ अशा एकूण २९१ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अद्यापही त्याप्रकरणी प्रभावी उपाययोजना झालेल्या नाहीत. तसेच, सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तसेच, २२ ठिकाणी घर, भिंतीचा भाग पडल्याच्या घटनांची नोंद झाली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
झाड पडण्याचे सत्र सुरूच….
दिवस – झाड – फांद्या पडणे
३० जून – ३० घटना १ जुलै – ४५ घटना २ जुलै – ९१ घटना ३ जुलै – ४५ घटना ४ जुलै – १०३ घटना
५ जुलै – २०३ घटना ६ जुलै – २९१ घटना
