मुंबई : मुंबईत जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या ३१ दिवसांत मिळून पडणाऱया पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या पाच दिवसांत पडला आहे. हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रात सरासरीहून ५ टक्के तर कुलाबा येथे १२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून महिन्यातील तूटही भरून निघाली आहे.

मुंबईत यंदा वळिवाच्या पावसाचा अभाव आणि पाऊस लांबल्याने जूनच्या पंधरवड्यात सांताक्रुज येथे १२.९ मिमी तर कुलाबा येथे केवळ ४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मोसमी पाऊस त्याच्या सरसरीवेळेहून १३ दिवस उशिराने म्हणजेच २३ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर २४ जून रोजी मुंबई शहर आणि उपनरात दमदार पावसाची नोंद होऊन जूनच्या सरासरीच्या निम्मा पाऊस नोंदला गेला होता. मात्र, काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैमध्ये मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले. मागील पाच दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असून समाधानकारक पावसाची नोंद होत आहे. अवघ्या पाच दिवसात नोंदल्या गेलेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रात जुलै महिन्यात सरासरी ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. १ जुलै ते ६ जुलै सकाळी ८:३० पर्यंत सांताक्रुज येथे ८९९. २ मिमी पाऊस नोंदला गेला जो सरासरीहून ५.१ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच कुलाबा केंद्राची एकूण सरासरी ७३४.१ मिमी असून येथे ८२३. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे जो सरासरीहून १२. २ टक्के अधिक आहे.

आतापर्यंतच्या मोसमी पावसाच्या हंगामात (१ जून ते ६ जुलै सकाळी ८:३0 पर्यंत ) सांताक्रुज येथे १०८६.४ मिमी तर कुलाबा येथे ९७९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, रविवारीपासून मुंबईत पावसाचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम येथील जनजीवनावर झाला आहे. शहरात आणि उपनगरात सोमवारी सकाळी पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे हवामान विभागाकडून सोमवारसाठी देण्यात आलेला ऑरेंज अलर्ट बदलून संपूर्ण दिवसासाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला. दरम्यान, सोमवारी वाऱ्यांचा वेग ताशी ८० ते ९० किमी इतका नोंदला गेला तसेच समुद्रालाही उधाण आले होते. दुपारच्या वेळी उंच लाटांची नोंद झाली. मुंबईला मंगळवारी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुठे पाऊस किती? ( रविवार सकाळी ८:३० ते सोमवार सकाळी ८:३०) राम मंदिर – २२१ मिमी विक्रोळी – १९९ मिमी

सांताक्रुज – १५९ मिमी

विद्याविहार – १३२ मिमी भायखळा – १२६ मिमी

शीव – १२४ मिमी

वांद्रे – ११९ मिमी

कुलाबा – १११ मिमी