मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी रात्रीपासून काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, काही भागात आज सकाळीही जोरदार पावसाची नोंद होत असून काही भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. तसेच आज हवामान विभागाकडून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह समुद्रालाही उधाण येण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान उंच लाटा उसळण्याचा अंदाज असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत जून महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल झाल्यानंतर सुरवातीच्या दिवसात जोरदार पावसाची नोंद मुंबई शहर आणि उपनगरात झाली होती. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत सोमवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. दरम्यान, शनिवारीही शहरात पावसाचा जोर कायम असून काही भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यात चर्चगेट परिसरातील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) आवारात, तसेच दादर येथील मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरातही झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ या कालावधीत पूर्व उपनगरात ९८ मिमी आणि पश्चिम उपनगरात ९४ मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबा येथे ९०.२ मिमी आणि सांताक्रूझ येथे १०९.६ मिमी पाऊस नोंदला गेला.

दरम्यान, मुंबईत तशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहत असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदविले आहे. तसेच समुद्रालाही उधाण आले असून आज दुपारी ३ च्या सुमारास ४.२६ मीटर, तर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ३.६० मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर ऑफ-शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा लांब पट्टा तयार झाला असून तो संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ते ७ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कुठे किती पाऊस ?

खार – १४६.४ मिमी

वांद्रे पश्चिम – १४३.४ मिमी

सांताक्रूझ – ११३..६ मिमी

लोअर परळ – १४० मिमी

मांटुगा – १३२ मिमी

मलबार हिल – ११६ मिमी

शिवडी – ११६ मिमी

मानखुर्द – १२६ मिमी

चेंबूर – १२४ मिमी

घाटकोपर – १२० मिमी