मुंबई : मुंबईसह उत्तर कोकणात मागील आठवडाभर जोरदार पावसाची नोंद होत असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईत रविवारी सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस पडत असून अनेक भाग यापूर्वीच पाण्याखाली गेले आहे. सध्या शहरात तशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत असून त्यामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशावर दाट ढगांची दाटी उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे.

मुंबईत शनिवारी शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला तर काही भागात चोवीस तासात २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, रविवारीही मुंबईसह ठाणे आणि पालघरला हवामान विभगाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह काही भागात मध्यरात्री पावसाचा जोर अधिक होता.

दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास समुद्राला उधाण येण्याचा अंदाज असून यादरम्यान उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ जून पासून आतापर्यत १ हजार १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट

कोकण किनारपट्टीवर पावसाचं जोर अधिक आहे तर उत्तर कोकण प्रदेशात तअनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून रविवारी रायगड, मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे तर सोमवारीही रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला असून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांनी कोकण किनारपट्टीसह घाट माथ्यवर पावसाची तीव्रता काहीशी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर उत्तर कोकण प्रदेशात मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून काही भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

रविवारी सकाळी ८:३० पर्यत नोंदला गेलेला पाऊस

कुलाबा – २६५ मिमी

विक्रोळी – २५७ मिमी

राम मंदिर – २५४ मिमी

सांताक्रूझ – २२७ मिमी

भायखळा – १८८ मिमी

विद्याविहार – १७३ मिमी

वांद्रे – १६२ मिमी

शीव – १५८ मिमी

चेंबूर – १४६ मिमी

ठाणे – १८४ मिमी