मुंबई : महामुंबईत जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे पावसाची तूट निर्माण झाली असून काही भागात मागील काही दिवसांच्या तुलनेत उकाड्यातही वाढ झाली आहे. पुढील काही दिवस महामुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पावसाचा जोर काहीसा वाढेल, असा अंदाज आहे.
मुंबईसह उत्तर कोकणात यंदा मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे जून महिन्यात उत्तर कोकणातील सर्वच भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली. जुलैमध्ये बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालींमुळे मुसळधार पावसाची नोंद होऊन काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून या भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाल्या असल्या तरीही राज्यावर त्याचा फारसा प्रभाव नसल्याने केवळ काही भागात वादळी पावसाची नोंद झाली. या दरम्यान उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मात्र, सर्वदूर पावसाचा अभाव असल्याने तसेच उष्ण आणि दमट वातावरणात वाढ झाल्याने या प्रदेशात उकाड्यातही वाढ झाली.
१ जून ते ३० ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला आहे. तर ठाणे, रायगड आणि मुंबईत सरासरीच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ३ ते १० सप्टेंबर दरम्यान कोकण प्रदेशासह राज्यातील काही भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील तीन चार-पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कालावधी (१ ते ३० ऑगस्ट)
विभाग पावसाची तूट
पालघर ४६ टक्के
ठाणे ३७ टक्के
मुंबई (सांताक्रूझ) ४० टक्के
मुंबई (कुलाबा) ६४ टक्के
रायगड ३२ टक्के
