मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी रात्रीही शहारासह उपनगरातही मुसळधार पावसाची नोंद झाली. काही सखल भाग पाण्याखाली गेल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. अनेक भागात गुरुवारी सकाळपर्यंत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, अवघ्या दोन दिवसात मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरी पावसाच्या ३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि उपनगराला रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही सोमवार पासून पावसाचा जोर असून बुधवारी रात्रीही मुसळधार पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी सकाळी ८:३० ते गुरुवारी सकाळी ८:३० या चोवीस तासांच्या कालावधीत २०४. ६ मिमी तर कुलाबा येथे १५८.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत जुलै महिन्यात कुलाबा येथे ७३४.१ मिमी तर सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी सरासरी पाऊस पडतो. दरम्यान, बुधवारपासून कुलाबा येथे
२२७.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ३००. ९ मिमी पावसाची नोंद झाली असून ही नोंद सरासरी पावसाच्या ३३ टक्के इतकी आहे. त्यामुळे जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान बुधवारी रात्रभर सलग पडणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटेपासूनच काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. सकाळीही पावसाचा जोर अधिक असल्याने ७ च्या सुमारास ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता.
मात्र, पावसाची तीव्रता वाढल्याने हवामान विभागाकडून काही काळासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता. सकाळी वरळी, प्रभादेवी, वीरा देसाई रोड, हिंदमाता, अंधेरी भुयारी मार्ग तसेच किंग सर्कल भागात पाणी साचल्याने या परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरु होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ६ पर्यंत पूर्व उपनगरांमध्ये १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरांमध्ये १४९ मिमी पावसाची नोंद झाली.
रविवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाकडून रविवार पर्यंत मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथे ५२ तर कुलाबा येथे ताशी ५६ किमी वारे वाहत असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदविले आहे.
