मुंबई : मागील काही दिवस मुंबईत अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, गुरुवारपासून शहरात आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण होते तसेच मागील काही दिवसांच्या तुलनेत उकाडाही जाणवत होता. पुढील काही दिवस उकाड्यात काहीशी वाढ होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

यंदा मुंबईत मोसमी पाऊस सरासरी वेळेतून उशिराने दाखल झाला. त्यामुळे जूनच्या पंधरवड्यात मुंबईत समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही. दरम्यान, जूनच्या अखेरीस पावसाचा जोर वाढला, तर जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच शहरात आणि उपनगरात महिन्याच्या सरासरी पावसाहून अधिक पावसाची नोंद झाली. सध्या कोकण प्रदेशासह राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर कमी झाला असून काही भागात हलक्या सरींची नोंद होत आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी ८:३० ते शुक्रवारी सकाळी ८:३० दरम्यान हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात ०.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे ०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत शहरात आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना मागील काही दिवसांच्या तुलनेत उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आणि उपनगरात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काहीसा उकाडा वाढला होता.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३२.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, ते गुरुवारी नोंद झालेल्या कमाल तापमानाहून दोन अंश सेल्सिअसने अधिक होते. तसेच दोन्हीही केंद्रावर शुक्रवारी २७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शनिवारपासून पुढील तीन दिवस मुंबईत हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.