मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारपासून पावसाची नोंद होत असून मुंबईतील काही भागात मंगळवारीही अधूनमधून मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच वादळी वाऱ्यांचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला होता. मुंबई शहरात सध्या ३८ किलोमीटर, तर सांताक्रूझ येथे ४३ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दरम्यान, बुधवारीही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
तसेच मुंबईत गुरुवारपर्यंत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून ‘यलो अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० या दरम्यान सांताक्रूझ येथे ४४.७, तर कुलाबा येथे ३४.८ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांच्या तुलनेत तीन – चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. तेथे सर्वाधिक यापूर्वीच जुलै महिन्याच्या सरासरी पावसाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, वादळी पावसामुळे मंगळवारीही समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या, तसेच बुधवारी सकाळी ११:४४ च्या सुमारास २.५३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा अंदाज आहे.
शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर असला तरीही अधूनमधून पाऊस पडत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, बुधवारी हवामान विभागाने मुंबईला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून यादरम्यान ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.
