गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. त्यामुळे शहरातील अपूर्ण नालेसफाईची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारच्या देयकाचे अधिदान देऊ नये, अशी मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.

मुंबईत शहरातील सर्वच नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचला असल्यामुळे पाण्याचा निचरा झालेला नाही. यावर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे ८३.९ कोटी तसेच छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे १०२.३५ कोटी एवढा खर्च करूनही नाल्यांची विदारक स्थिती पाहता १० टक्के देखील नालेसफाई झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी याबात तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा मुंबईकरांच्या हितासाठी भारतीय जनता पक्षामार्फत जनआंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा सागर यांनी दिला.