मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर – हिंदमाता, शीव येथील गांधी मंडई, किंग्ज सर्कल, अंधेरी भुयारी मार्ग आदी परिसर बुधवारी पाण्याखाली गेले. महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाणी तुंबण्यापासून संबंधित भागांची सुटका झालेली नाही. पहिल्याच मुसळधार पावसात संबंधित भाग जलमय झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना यंदाही दिलासा मिळाला नाही.
दादर – हिंदमाता परिसराच्या विशिष्ट भागोलिक रचनेमुळे दरवर्षी हमखास या भागात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी भूमिगत पाणी साठवण टाक्यांचा प्रकल्प उभारला. या साठवण टाक्यांची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवून ठेवण्याइतकी आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी पहाटेपर्यंत कायम होता. क्षमतेपेक्षा अधिक पट पाऊस झाल्याने हिंदमाता परिसर पाण्याखाली गेलाच. दरवर्षीप्रमाणे रस्त्यावर २-३ फूट पाणी साचले होते. हिंदमाता परिसरातील पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा, यासाठी सातही पंप कार्यान्वित ठेवण्यात आले होते.
दरम्यान, सखल भागांपैकी एक असणारे किंग सर्कल, गांधी मंडई हे परिसर देखील पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांना यंदाही दिलासा मिळाला नाही. लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना बुधवारी कुचकामी ठरल्या.
अंधेरी भुयारी मार्गासाठी उपाय सापडेना
अंधेरी भुयारी मार्गाचीही सारखीच स्थिती असल्याचे निदर्शनास आले. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना भरती आल्यास मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे लगतचा अंधेरी भुयारी मार्ग, दाऊद बाग, आझाद नगर हे परिसर पाण्याखाली जातात. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे बुधवारी अनेक तास अंधेरी भुयारी मार्ग जलमय स्थितीत होता. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सकाळी ६ च्या दरम्यान वाहतूक सुरळीत झाली. अंधेरी भुयारी मार्गाबाबत पाणी तुंबण्याची समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
महानगरपालिकेतर्फे २०१८ त्याठिकाणी एक प्रकल्प सुरु करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. सद्यस्थितीत पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी तेथे तीन पंप बसविण्यात आले आहेत. तसेच, त्याठिकाणी पाणी साठवण टाक्या तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. प्रकल्पाबाबत आयआयटी मुंबईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरेंची टीका
२०२० ते २०२२ दरम्यान हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलन सबवे येथे पाणी साठवण टाक्यांच्या प्रकल्पाची परिणामकारकता सिद्ध झाली होती. मात्र, आता हिंदमाता येथील पंप आणि पाणी साठवण टाक्यांची योग्य प्रकारे देखरेख केली जात नाही. त्यामुळे तो परिसर पूरमुक्त राहण्याऐवजी पुन्हा पाण्याखाली जात आहे. ही अत्यंत वाईट बाब आहे. २०२१ नंतर भाजपने मुंबई महापालिकेच्या निधीचा ऱ्हास केला, एकही नवीन पाणी साठवण टाकी प्रकल्प उभारला नाही, असा टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
भलेमोठे झाड पडले; वाहनांच्या लांबच लांब रांगा
दादर येथील स्वामी नारायण परिसरात बुधवारी सकाळी भलेमोठे झाड पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले. झाड पडल्याने तेथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची या कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडाचे छोटे छोटे तुकडे केले आणि बाजूला सारले. रस्त्यावरील अडथळा दूर झाल्यांनतर प्रवाशांनी सुटकेची निश्वास सोडला.
