मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असणारा मोसमी पाऊस यंदा विलंबाने आला असला तरी या पावसाने प्रशासकीय यंत्रणांना जोरदार तडाखा दिला. यंदा नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून मुंबई तुंबणार नसल्याचे महापालिका प्रशासनाचे दावे पहिल्याच पावसाने फोल ठरवले. शहरात आणि उपनगरात जून महिन्याच्या सरासरीच्या निम्मा पाऊस चोवीस तासात बरसला. तुंबलेले शहर, कोंडलेले रस्ते, रखडलेला प्रवास, कोलमडलेली रेल्वे वाहतूक यांसह दरसालप्रमाणे मुंबईकरांचा पावसाळा सुरू झाला.
मुंबईत यंदा मोसमी पाऊस विलंबाने दाखल झाला. शहरात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात होऊन बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रात्रीपासून शहरातील अनेक भाग जलमय होण्यास सुरुवात झाली होती. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने विविध मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिलांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत इच्छित स्थळ गाठावे लागले. तसेच रस्ते जलमय झाल्याने बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
बुधवारी सकाळी साधारण दहानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र मंगळवार रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत २०० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद एका दिवसांत झाली. यंदा पाणी न साचण्याचे रेल्वे आणि महापालिकेचे दावे पहिल्याच पावसात वाहून गेले. त्यामुळे वाढत्या उकाड्याने घशाला कोरड पडलेल्या मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पहिल्या पावसाने पळवले.
महापौरांदेखत अधिकारी उघड्या गटारात
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला. किंग्स सर्कल येथील गांधी मार्केटमध्ये पाणी साचल्याने अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. महापौर तिकडे पाहणीसाठी गेल्या. या पाहणी दौर्यादरम्यान महापालिकेचा एक अधिकारी पदपथालगतच्या उघड्या गटारात पडला. पाणी साचल्याने अधिकार्याला गटाराचा अंदाज आला नाही आणि तोल जाऊन तो पडला. त्याचवेळी अन्य अधिकारी- कर्मचार्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढले.
संबंधित अधिकारी एफ उत्तर विभागातील मुकादम असल्याचे समजते. महापौरांच्या नजरेसमोरच तो प्रकार घडल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिकार्यांना खडे बोल सुनावले. मॅनहोल कुठेही उघडे आढळून आल्यास संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेल्या उघड्या गटारांमुळे नागरिकांना त्रास झाल्यास अजिबात सहन केले जाणार नाही. अधिकार्यांना थेट निलंबित केले जाईल, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
रेल्वे सेवा विस्कळीत
मुसळधार पावसाने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत केली. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने लोकल सेवा अडीच तास ठप्प झाली होती, तर मध्य रेल्वेरील मुख्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूकही मंदावलेली होती. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या उशिरा धावत होत्या.
